• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

dhurandhar 2 : धुरंधर 2 पाहिल्यानंतर कथा, प्रोपेगेंडा या पलीकडे जाऊन ‘रॉ’ बद्दल निर्माण झालेले काही प्रश्न

March 24, 2026 by admin Leave a Comment


दोन दिवसांपूर्वीच ‘धुरंधर द रिवेंज’ सिनेमा पाहिला. डिसेंबर महिन्यात ‘धुरंधर’ चा पाहिला भाग पाहिल्यानंतर पार्ट 2 बद्दल प्रचंड उत्सुक्ता होती. ‘धुरंधर 2’ सिनेमा तुम्हाला कुठेच निराश करत नाही. जसकीरतच्या अगदी पहिल्या सीनपासून हा चित्रपट तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो, तो शेवटपर्यंत. हे दिग्दर्शकाचं कौशल्य, यश म्हणावं लागेल. पहिल्या भागात गँगस्टर रेहमान डकैतचा मृत्यू झाल्यानंतर ल्यारीचा पुढचा बादशाह कोण होणार? हमजा अली मझारी बनलेला जसकीरत मूळचा कोण आहे? त्याच्या कुटुंबासोबत काय घडलेलं? तो भारताचा गुप्तहेर कसा बनला? मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा बदला कसा घेणार? हे असे अनेक प्रश्न धुरंधरचा पहिला भाग संपल्यानंतर मनात होते. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ‘धुरंधर द रिवेंज’ मध्ये दडलेली आहेत.

धुरंधर सिनेमाच्या दोन्ही भागांची मेकिंग जबरदस्त आहे या बद्दल अजिबात शंका नाही. धुरंधर पाहिल्यानंतर बऱ्याच काळाने स्वत:ची कथा, उत्तम आशय, विषय, मांडणी असलेला हिंदी सिनेमा पहायला मिळाला, अशी थिएटर बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात भावना असते. धुरंधर चित्रपटाचा प्लस पॉइंट म्हणजे या चित्रपटाची कथा. प्रेक्षक या सिनेमात गुंतून जातात ते या कथेमुळे. भारतीय एजंट बनून पाकिस्तानात वावरणारा रणवीर सिंह म्हणजे हमजा अली मझारी या चित्रपटाचा मुख्य हिरो आहे. पण प्रेक्षकांना हमजाच्या बरोबरीने रेहमान डकैत, यलीना, जमील जमाली, अरशद पप्पू, अस्लम चौधरी, उजैर बलोच ही पात्र लक्षात राहतात. हे या चित्रपटाचं सर्वात मोठं यश आहे. अलीकडे हिंदी सिनेमात साऊथच्या चित्रपटांची कॉपी करण्याचा मोठा ट्रेंड आला आहे. अभिनय, कथा, डायलॉग, गाणी, सिनेमॅटोग्राफी ही हिंदी सिनेमाची मूळ ओळख आहे. पण मागच्या काही वर्षातील ट्रेंड बघता हिंदी सिनेमाची ही ओळख पुसली जाणार की काय अशी शंका निर्माण झाली होती.

पैशापेक्षा पण धुरंधरचं सर्वात मोठ यश काय?

पण धुरंधरने हिंदी सिनेमामध्ये अजूनही ती ताकद आहे हे दाखवून दिलय. धुरंधर एक चांगला चित्रपट आहे, प्रेक्षकांना हवा असणारा सगळा मसाला त्यात आहे. भारत-पाकिस्तान संघर्ष, गुप्तहेर, खिळवून ठेवणारं कथानक हे सर्व त्यात आहे, त्यामुळे धुरंधर कमाईचा नवीन विक्रम नोंदवणार ही माझ्या दृष्टीने मोठी बाब नाही. पण धुरंधरमुळे बॉलिवूडमधील प्रस्थापित आणि उदयोन्मुख दिग्दर्शकांचा हिंदी सिनेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणार, आपणही धुरंधर सारखा स्वत:चा अस्सल ओरिजनल काहीतरी बनवलं पाहिजे ही प्रेरणा निर्माण होणं माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे.

धुरंधर चित्रपटापलीकडे निर्माण होणारे प्रश्न कुठले?

‘धुरंधर द रिवेज’ पाहिल्यानंतर या चित्रपटाने माझ्या मनात, डोक्यात अनेक प्रश्न निर्माण केले. जे या सिनेमापलीकडचे प्रश्न आहेत. विचारांच्या याच चक्रातून मी काही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तर स्पेक्युलेटिव म्हणजे अंदाजात्मक, अटकळ बांधणारी आहेत. कारण या प्रश्नांची उत्तर कधीच कोणी समोर येऊन ठोसपणे देणार नाही. पण अंदाज मात्र वास्तवाच्या जवळ नेणारा आहे. आज जगात अनेक देशांच्या गुप्तहेर संघटना आहेत, ज्यांच्या नावावर थक्क करणारे पराक्रम आहेत. यात इस्रायलची मोसाद, अमेरिकेची सीआयए, रशियाची केजीबी या संघटनांची नावं प्रामुख्याने घेतली जातात. या देशांसारखीच भारताची स्वत:ची गुप्तचर संस्था आहे, रिसर्च एंड एनालिसिस विंग (R&AW) म्हणजे रॉ. भारताच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आयबी आणि बाह्य सुरक्षेची जबाबदारी रॉ वर आहे.

सर्वात मोठ ऑपरेशन म्हणजे पेजर ब्लास्ट

1962 सालच्या चीन युद्धातील अपयश आणि 1965 सालचं पाकिस्तान विरुद्ध युद्ध यानंतर रॉ ची गरज निर्माण झाली. त्याआधी आयबीकडे ही जबाबदारी होती. म्हणून इंदिरा गांधी सरकारने रामेश्वर नाथ काव यांच्या मार्गदर्शनाखाली 21 सप्टेंबर 1968 रोजी रॉ ची स्थापना केली. स्थापनेनंतर अवघ्या तीन वर्षात 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात रॉ ने आपली क्षमता सिद्ध केली. आपण काय करु शकतो याची रॉ ने जगाला प्रचिती आणून दिली.भारताने हे युद्ध जिंकलं. त्यात रॉ चा ही मोठा वाटा आहे. इस्रायलच्या मोसादचे कारनामे आपण नेहमीच ऐकत असतो. त्यावर अनेक चित्रपट, पुस्तक आली आहेत. मोसादच अलीकडच्या काळातील सर्वात मोठ ऑपरेशन म्हणजे पेजर ब्लास्ट. हा एक थक्क करणारा पराक्रमच आहे. इस्रायलने लेबनॉनमधील हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांना आधी पेजर वापरण्यासाठी भाग पाडलं. जेणेकरुन त्यांचं लोकेशन ट्रॅक होऊ नये. नंतर बनावट कंपनी स्थापन करुन त्यांनाच पेजर विकले. हिज्बुल्लाहचे लोक पेजर म्हणून जी वस्तू वापरत होते, प्रत्यक्षात तो पेजर बॉम्ब होता. इस्रायलने आपली गरज आणि वेळेनुसार एकदिवस अचानक एकाचवेळी त्या पेजरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. अनेक दहशतवादी यात मारले गेले.

R&AW जे घडवायचय ते गुपचूपपणे करतात

अमेरिकेची सीआयए सुद्धा अशीच आहे. ओसामा बिन लादेनला मारण्यापासून ते शीत युद्धाच्या काळात अनेक ऑपरेशन्स सीआयएने यशस्वीरित्या केले. त्यावर सुद्धा अनेक सिनेमे, पुस्तकं आली आहेत. भारताची R&AW सुद्धा अशा ऑपरेशन्समध्ये कुठेही मागे नाही. फक्त ते आपल्या कामाची फार चर्चा होऊ देत नाहीत. जे घडवायचय ते गुपचूपपणे करतात. आता धुरंधर सिनेमाचे दोन्ही भाग पडद्यावर पाहताना असं राहून, राहून असं वाटत होतं की, पाकिस्तानात जे घडवलय ते पडद्यावर यावं अशी कुठेतरी या मिशनमध्ये सहभागी असणाऱ्यांची इच्छा आहे. भारताच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी रॉ वर आहे. त्यामुळे अशी ऑपरेशन रॉ च करु शकते.

पाकिस्तानात भारताच्या कट्टर शत्रुंच्या हत्या

चित्रपट सुरु होण्याआधी फिक्शनल म्हणजे हे काल्पनिक आहे असं सांगितलं जातं. पण धुरंधर पाहताना असं वाटतं नाही की हे सगळं काल्पनिक आहे. धुरंधर सिनेमाच्या पहिल्या पार्टची कथा सुरु होते ती कंदहार विमान अपहरणाच्या घटनेने, त्यानंतर संसदेवर 2001 साली जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेला हल्ला. या अशा सततच्या हल्ल्यांमुळे अजय सन्याल नावाचा अधिकारी ऑपरेशन धुरंधरची आखणी करतो असं चित्रपटात दाखवलं आहे. अजय सन्याल हे जे पात्र आहे, ते भारताचे NSA अजित डोवाल यांच्याशी साधर्म्य साधणारं आहे. ऑपरेशन धुरंधरचा मुख्य उद्देश असतो पाकिस्तानी अंडरवर्ल्डमध्ये घुसखोरी करणं. मागच्या काही काळात पाकिस्तानात भारताच्या कट्टर शत्रुंच्या हत्या झाल्या आहेत. पाकिस्तानी अंडरवर्ल्डमधील आपसातील भांडणातून, संघर्षातून या हत्या झाल्याच्या बातम्या आल्या.

पाकिस्तानात मारले गेलेले काही भारतविरोधी दहशतवादी

आमिर सरफराज – लश्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईदचा निकटवर्तीय आमिर सरफराजची पाकिस्तानात लाहोरमध्ये हत्या झाली. दोन अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून त्याची हत्या केली.

परमजीत सिंह पंजवड – 6 मे 2023 रोजी पाकिस्तानच्या लाहौरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी खालिस्तान कमांडो फोर्सचा चीफ परमजीत सिंह पंजवडची गोळी मारुन हत्या केली.

बशीर अहमद पीर – 20 फेब्रुवारी 2023 रोजी जम्मू कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलमची पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.हिजबुल मुजाहिदीनचा लॉन्चिंग कमांडर बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलमची रावळपिंडीमध्ये हत्या झाली.

एजाज अहमद अहंगर – एजाज अहमद अहंगरची 22 फेब्रुवारी 2023 मध्ये अफगानिस्तानच्या काबूलमध्ये हत्या झाली. त्याला भारतात इस्लामिक स्टेटची (आईएस) सुरुवात करायची होती. एजाज दहशतवादी संघटना अल कायदाच्या संपर्कात होता.

मागच्या दोन-तीन वर्षात पाकिस्तानात झालेल्या या हत्या आहेत. हे सर्व दहशतवादी भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतले होते. धुरंधर द रिवेंजमध्ये हेच सर्व दाखवलं आहे. त्यामुळे हे सर्व करणारा हमजा अली मंझारी उर्फ जसकिरत एक होता की अनेक असा प्रश्न निर्माण होतो. त्याशिवाय पाकिस्तानात हे सर्व घडत होतं, या चित्रपटाची जुळवाजुळव सुरु असण्याचा सुद्धा हाच काळ आहे. या प्रश्नांची ठोस उत्तरं कधीच मिळणार नाहीत आणि मिळूही नयेत. फक्त चित्रपटाच्या निमित्ताने काही प्रश्न मनात आले ते सर्व फक्त तुमच्याशी शेअर केलं.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Price Today : युद्धविरामानंतर सोनं स्वस्त, ही संधी सोडू नका .. पुढला काय भरवसा ? सोनं-चांदीचे आजचे दर काय ?
  • पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..
  • कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in