
महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाची देशभरातही मोठी चर्चा सुरू आहे. भोंदूगिरी, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक अशा गंभीर आरोपांखाली खरात याला अटक करण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात काही राजकीय नेत्यांशी असलेल्या कथित संबंधांवरूनही चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. “खरात मुस्लिम असता तर सगळ्या मुसलमानांची वरात काढली असती. जात-धर्म न पाहता नालायक माणसाला नालायक म्हणण्याची हिम्मत असली पाहिजे,” असे ते म्हणाले.
यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेसवर टीका केली आहे. “मुख्यमंत्र्यांकडे प्रकरण आल्यावर नाशिक पोलिसांना सूचना देऊन अत्यंत गुप्तपणे अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. यात सरकारचाच हात असून भोंदूगिरीला हे सरकार कधीही पाठीशी घालत नाही,” असे पडळकर म्हणाले. तसेच, या प्रकरणात काँग्रेसच्या भूमिकेला फारसे महत्त्व नसल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.
Leave a Reply