
शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेनंतर आज खासदार अरविंद सावंत यांना ‘मातोश्री’वर बोलावण्यात आले आहे. सावंत हे शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले असून दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू असल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, काल वृत्तपत्रांमध्ये अरविंद सावंत यांच्यासह काही खासदारांची नावे छापून आल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर तसेच पुढील कायदेशीर कारवाईवर या बैठकीत चर्चा होणार आहे. संबंधित वृत्तपत्रांना कायदेशीर नोटीस बजावण्याची भूमिका सावंत यांनी यापूर्वीच स्पष्ट केली होती. दरम्यान, “मी ठाकरेंच्या शिवसेनेला मरेपर्यंत सोडून जाणार नाही,” असे विधान सावंत यांनी लिहून दिल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘ऑपरेशन टायगर’नंतर शिवसेनेतील राजकीय हालचाली वाढल्या असून शिंदे गटाकडून ठाकरे गटातील खासदारांविषयी सातत्याने केले जाणारे दावेही चर्चेत आहेत. अशा पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्यातील ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply