
पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन वायू वाहून नेणाऱ्या गॅस टँकरचा अपघात झाला होता. या अपघातामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्गासह जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघात घडून 15 ते 16 तास उलटले, तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नव्हती. लोणावळ्यापर्यंत सुमारे 20 ते 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवासी मध्यरात्रीपासून या वाहतूक कोंडीत अडकले होते. काही प्रवाशांना रुग्णालयात पोहोचायचे होते, मात्र तेही रस्त्यातच अडकले होते. अनेक लोकांच्या महत्त्वाच्या बैठका रद्द झाल्या आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक तासांपासून प्रवासी तहानभूक विसरून महामार्गावर थांबले होते.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करून म्हटले की, “एक टँकर उलटतो आणि दोन महत्वाच्या शहरांचा संपर्क 24 तासासाठी तुटतो. व्हा! काय ही व्यवस्थेची अवस्था? उद्या आपत्कालीन परिस्थितीत असली शरम ओढवण्यापेक्षा यावर उपाययोजना करायला हवी. मात्र आता ह्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडीला नेहरू जबाबदार असं म्हणू नका.” दानवे यांनी या प्रसंगी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत, उपाययोजनेची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
Leave a Reply