
Akshaya Tritiya 2026 : दसरा, लक्ष्मीपूजन, गुढीपाडवा अशा महत्त्वाच्या क्षणी सोने खरेदी करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे. अनेक जण अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देखील सोने खरेदी करतात. पण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी फक्त सेनेच खरेदी केले पाहिजे असं काहीही नाही… सांगायचं झालं तर, भारतीय संस्कृतीत ‘अक्षय्य तृतीये’ला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी जे काही केले जाते त्याचे फळ ‘अक्षय’ (अमर्याद) मिळते. अक्षय तृतीयेचा उल्लेख होताच, सर्वप्रथम सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार मनात येतो. पण, आजच्या काळात प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य होईलच असे नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, केवळ सोनेच नव्हे, तर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असलेल्या काही पवित्र वस्तूदेखील घरी आणता येतील.
संपत्ती आणि समृद्धी वाढवणाऱ्या 5 गोष्टी येथे दिल्या आहेत:
मीठ: नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक आहे. ज्योतिषी सांगतात की अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्यापेक्षा मीठ खरेदी करणे अधिक योग्य आहे. मीठ हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. या दिवशी घरात मीठ आणल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता व धनवृद्धी होते.
मातीचे भांडे: यशाची पहिली पायरी ठरेल, या दिवशी नवीन मातीचे भांडे किंवा माठ विकत घेणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की मातीचे भांडे विकत घेऊन त्यात पाणी भरल्याने जीवनातील संकटांवर मात करून उच्च पदावर पोहोचण्यास मदत होते. हे शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
तुळशीचे रोप: लक्ष्मीचे आगमन होईल. ज्यांच्या घरी तुळशीचे रोप नाही, त्यांनी अक्षय तृतीयेला नवीन रोप विकत घेऊन लावावे. घरी तुळस आणणे म्हणजे देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासारखे आहे. यामुळे घर अशांतीमुक्त राहते आणि घरात शुभ-समृद्धी येते.
हळद-केशर: शुभ नशिबाचे प्रतीक मानले जाते. अत्यंत कमी किमतीत मिळणारी हळद आणि केशर ही शुभ मानली जातात. अक्षय तृतीयेला त्यांची खरेदी केल्यास तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव लाभेल. तुम्ही हाती घेतलेली सर्व शुभ कार्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय वेळेवर पूर्ण होतील.
पुस्तके: ज्ञान आणि संपत्तीचा संगम मानले जाते. शिक्षण ही सर्वात मोठी संपत्ती आहे. या दिवशी पुस्तके खरेदी केल्याने देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी यांचा एकत्रित आशीर्वाद मिळतो. हे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. मुलांच्या शिक्षणात प्रगती पाहण्यासाठी अक्षय तृतीयेला पुस्तके किंवा स्टेशनरी खरेदी करणे उत्तम ठरते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply