• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हजारो किलोमीटर दूर अंतरावरच युद्ध, पण बिअर, कंडोमसह भारतात अजून कुठल्या-कुठल्या क्षेत्रांना बसणार फटका?

April 3, 2026 by admin Leave a Comment


इराण-अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद संपूर्ण मध्यपूर्वेत उमटत असले तरी भारतातील बाजारपेठा, कारखाने आणि सर्वसामान्यांच्या घरापर्यंतही युद्धाच्या झळा पोहोचत आहेत. हे केवळ युद्ध नाही तर कच्चे तेल, गॅससह इतर अनेक वस्तूंच्या पुरवठा साखळीला बसलेला मोठा तडाखा आहे, ज्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. तेल आणि गॅसच्या पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. रस्त्यावरील डांबरापासून, बिअर, पॅकेजिंग ते अगदी कंडोमपर्यंत अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. हे युद्ध आणखी किती काळ चालेल, याचं उत्तर अद्याप अस्पष्टच आहे. परंतु यामुळे कोणकोणत्या गोष्टींवर कसा परिणाम झाला आहे किंवा होत आहे, याबद्दल जाणून घेऊयात..

बांधकाम आणि रिअल इस्टेटवर परिणाम

इराण-अमेरिकेतील तणावाचा परिणाम प्रामुख्याने ऊर्जेच्या खर्चावर झाला आहे, ज्याचा थेट परिणाम बांधकाम क्षेत्रावर होत आहे. एलएनजी आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे सिमेंट, स्टील आणि टाइल्स कारखान्यांचा खर्च वाढला आहे. गुजरातमधील मोरबीसारख्या औद्योगिक क्लस्टर्समधील सिरॅमिक युनिट्सचा वेग मंदावला आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांसाठी प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. परिणामी अनेक प्रकल्पांना विलंब होत असून घरबांधणी अधिकाधिक महाग होत आहे.

कंडोमवरील परिणाम

मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावामुळे भारतातील 7000 ते 8000 कोटी रुपयांच्या कंडोम उद्योगावरही परिणाम दिसून येत आहे. पेट्रोकेमिकल पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे सिलिकॉन तेल आणि अमोनियासारख्या कच्च्या मालाची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे कंडोमच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. भविष्यात कंडोमच्या किमती वाढण्याची किंवा उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे.

काच उद्योग

काचेचा उद्योग हा मोठ्या प्रमाणावर गॅसवर अवलंबून असतो. मध्य पूर्वेकडून होणाऱ्या गॅस पुरवठ्यातील व्यत्ययामुळे या क्षेत्रावरदेखील गंभीर परिणाम झाला आहे. उत्तर प्रदेशातील फिरोजाबादसारख्या काच उद्योगाच्या प्रमुख केंद्रांमध्ये अनेक भट्ट्या बंद पडल्या आहेत किंवा कमी क्षमतेने कार्यरत आहेत. यामुळे उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांनी घट होत आहे. याचा परिणाम फक्त बांगड्यांच्य उद्योगावरच झाला नाही, तर बिअर, औषधं आणि अत्तराच्या बाटल्यांच्या पुरवठ्यावरही होत आहे.

‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, काच उत्पादकांना अंशत: किंवा पूर्णपणे उत्पादन थांबवावं लागलं आहे. यामुळे बाटल्यांच्या किंमतीत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फक्त बाटल्याच नाही तर इतर पॅकेजिंगचाही खर्च वाढला आहे. कागदी कार्टनची किंमत दुप्पट झाली असून लेबल आणि टेपसारखेही साहित्य महाग झाले आहे. वाहतुकीतील विलंबामुळे अॅल्युमिनियमच्या आयातीला फटका बसत असून कॅन उत्पादकांनी पुरवठ्यात कपात करण्याचा इशारा दिला आहे.

शिपिंग आणि व्यापार

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वांत महत्त्वाच्या तेल आणि व्यापारी मार्गांपैकी एक आहे. तिथल्या वाढत्या तणावामुळे जहाज वाहतूक कंपन्यांचा विम्याचा खर्च वाढला आहे. याचा परिणाम निर्यात आणि आयातीवर झाला आहे. भारतासारख्या व्यापारावर अवलंबून असलेल्या देशासाठी हा मोठा धक्का आहे, कारण यामुळे वस्तूंची किंमत आणि वितरणाचा कालावधीसुद्धा वाढत आहे.

रेस्टॉरंट्स आणि खाद्य उद्योग

एलपीजी सिलिंडर्सचा तुटवटा आणि इतर इंधनांच्या वाढलेल्या किंमतींमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद पडले आहेत. तर काहींनी मेन्यूमधील पदार्थ कमी केले आहेत. अनेक रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये जेवणाच्या किंमती वाढल्या आहेत.

विमान वाहतूक क्षेत्र

तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढला आहे. अनेक विमान कंपन्या तिकिटांचे दर वाढवण्याचा किंवा उड्डाणे कमी करण्याचा विचार करत आहेत. याचा परिणाम प्रवाशांच्या संख्येवर आणि नियोजनावर होत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तसंच पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतीमधील वाढ आणि पुरवठा साखळीतील व्यत्यत यांमुळे भारतासह जगभरात इंधनाच्या किंमतीमध्ये चढउतार होत आहेत. किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने उत्पादन शुल्क कमी केलं हे. यामुळे महसूलाचं नुकसान होत आहे. युद्धाचा बोजा सर्वसामान्यांवर पडू नये याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे.

लघु उद्योगांना फटका

युद्धाचा सर्वाधिक फटका लघु आणि मध्यम उद्योगांना बसत आहे. कच्चा माल महागला आहे, वीज आणि गॅसचा खर्च अधिक झाला आहे आणि तसंच मागणीत मोठी घट झाली आहे. यामुळे लघु उद्योगांची परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. अनेक लहान व्यवसायांना उत्पादन कमी करावं लागलं आहे किंवा तात्पुरतं बंद करावं लागलं आहे. यामुळे रोजगारावर परिणाम झाला आहे.

शेती

अमेरिका-इराणमधील युद्धाचा परिणाम शेतकऱ्यांवरही होत आहे. कारण बियाणे आणि खतांचा पुरवठा हा पॅकेजिंग आणि वाहतुकीवर अवलंबून असतो. सध्या या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींवर परिणाम होत असल्याने अनेक कंपन्यांना पॅकेजिंग साहित्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांपर्यंत बियाणं आणि खतांचा वेळेवर पुरवठा होण्यास अडथळा येत आहे.

पोलाद आणि धातू उद्योग

पोलाद आणि धातू उद्योगांमध्ये गॅस आणि ऊर्जेची महत्त्वपूर्ण भूमिका असते. युद्धामुळे एलपीजी आणि इतर इंधनांच्या तुटवड्याने अनेक लहान आणि मध्यम कारखान्यांवर दबाव आला आहे. अॅल्युमिनियमसारख्या धातूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे वाहन, पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री श्रेत्रांचाही खर्च वाढला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जया बच्चन यांची कथा अन् एका रात्रीत बदलले अमिताभ बच्चन यांचे नशीब, चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर, कमाई…
  • IPL 2026 दरम्यान रंगणार 2 मालिकांचा थरार, 6 सामन्यांच्या वेळेत अचानक बदल, कारण काय?
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत होणार बदल, तीन संघांना एन्ट्री मिळताच स्वरूप बदलणार
  • या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून हैराण झालेल्या जया प्रदा, घरा-घरात लागले होते फोटो, लोक करायचे पूजा
  • वजन कमी करण्याची औषधे वजन कमी करतात की धोका वाढवतात? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in