
Tanaji Galgunde : ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातून बाळ्या ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता तानाजी गळगुंडे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनयाच्या प्रवासाबरोबरच आयुष्यात आलेले अनुभव, आर्थिक चढ-उतार आणि त्यातून घेतलेले धडे याबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.
‘सैराट’ चित्रपटानंतर अचानक मिळालेली प्रसिद्धी आणि पैसा यासाठी आपण मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार नव्हतो, असे तानाजी गळगुंडेने स्पष्टपणे सांगितले. एका मुलाखतीदरम्यान तो म्हणाला की, ‘सैराटनंतर माझ्याकडे चांगले पैसे आले होते. मात्र त्या पैशांचे योग्य नियोजन कसे करावे, याची मला काहीच माहिती नव्हती. आर्थिक अज्ञानामुळे मी मोठी चूक केली.”
तानाजीने सांगितले की, त्या काळात जवळचे मित्र म्हणून ओळखले जाणारे काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. ‘कोणी बिझनेस सुरू करण्याच्या नावाखाली पैसे घेतले तर कोणी गरज असल्याचे सांगून पैसे मागितले. मी कोणताही विचार न करता सगळ्यांना पैसे देत गेलो. पण आज तेच लोक मला ब्लॉक करून बसले आहेत. फोनही उचलत नाहीत. आता मी त्यांना मित्रही मानत नाही, असे त्याने भावनिक शब्दांत सांगितले. मात्र या सगळ्या अनुभवातून आपण खूप काही शिकलो असल्याचेही त्याने नमूद केले.
सैराटनंतर स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी तानाजीने पुस्तक वाचन सुरू केले ज्यामुळे त्याच्या ज्ञानात मोठी भर पडली. सैराटपूर्वीचा तानाजी आणि आजचा तानाजी यात खूप फरक आहे असे तो म्हणतो. मात्र, अभिनय क्षेत्रातील अज्ञानामुळे त्या काळात योग्य निर्णय घेता न आल्याची खंतही त्याने व्यक्त केली. तेव्हा मला जास्त काम करायला हवे होते. योग्य मार्ग दाखवणारा कोणी नव्हता असे तो सांगतो.
नंतरच्या भूमिका फारशा चर्चेत नाहीत
अचानक मिळालेल्या प्रसिद्धीमुळे आपण काही काळ गोंधळून गेलो होतो. हेही तानाजीने मान्य केले. सैराटनंतर त्याने जवळपास 20 ते 22 चित्रपटांत काम केले, मात्र त्यापैकी फारशा भूमिका लक्षात राहण्यासारख्या नव्हत्या असं देखील तो म्हणाला.
आपल्या मूळ आयुष्याविषयी बोलताना तानाजी म्हणाला की, चित्रपटांमध्ये येण्याआधी मी शेती करत होतो. शाळा-कॉलेजमध्ये अभ्यासात फार हुशार नव्हतो, त्यामुळे शेतीच करायची हे ठरलेले होते. सैराटमध्ये अगदी अपघाताने आलो. आजही तो शेती करत असल्याचे त्याने सांगितले. अभिनयाची कामे मिळतील तशी करत असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
Leave a Reply