
स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली लोकप्रिय मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक टप्पा प्रेक्षकांना खूप आवडतोय. आता मालिकेत सावित्री आणि जोतीराव विवाहबंधनात अडकतानाचा अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. या अद्भुत विवाहसोहळ्याची मांडणी अत्यंत देखणी आणि काळाच्या पार्श्वभूमीला साजेशी करण्यात आली आहे.
सावित्री आणि जोतीराव यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण भावपूर्ण पद्धतीने सादर करताना परंपरा, विधी आणि संस्कृतीचा सन्मान राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. खंडोबाला लगीनचिठ्ठी अर्पण करण्याच्या मंगल परंपरेपासून ते मुहूर्तमेढ रोवण्यापर्यंत प्रत्येक विधी मोठ्या श्रद्धेनं साजरा केला जाणार आहे. चुडा भरण्याचा हळुवार सोहळा, हळदीचा मंगल समारंभ, दागिने आणि साडीमागचं सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व या सगळ्या पारंपरिक रितीरिवाजांचं सुंदर दर्शन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळतोय. विशेष करुन या मालिकेतील लहानग्या सावित्रीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सावित्रीबाईंचा ठाम निर्धार, आत्मविश्वास, शिक्षणाची ओढ, अन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द या सगळ्या गुणांचा प्रत्यय लहानग्या सावित्रीने साकारलेल्या प्रत्येक प्रसंगात जिवंत होते. ही भूमिका साकारणारी गुणी बालकलाकार तक्षा शेट्टी हिने आपल्या सहज अभिनयातून सावित्रीबाईंचं बालपण अतिशय प्रामाणिकपणे साकारलं आहे.
View this post on Instagram
सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखलेही छोट्या सावित्रीचा अभिनय पाहून भारावून गेली आहे. छोट्या सावित्रीचं कौतुक करताना मधुराणी म्हणाल्या, ‘छोट्या सावित्रीची चुणूक आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी लागणारी ऊर्जा तक्षाने सहजरित्या पकडली आहे. मला प्रचंड अभिमान वाटतो तिचा अभिनय पहाताना. तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा माझ्याच छोट्या रुपाला भेटल्याचा भास झाला. इतक्या लहान वयातही तिची मेहनत, तिचं शिस्तबद्ध काम, तिची मेहनती वृत्ती आणि प्रत्येक सीनबद्दलची तळमळ खरंच वाखाणण्यासारखी आहे. ती फक्त भूमिका साकारत नाही, तर ती ती भूमिका मनापासून जगते. हे खरंच वाखाणण्यासारखं आणि कौतुकास्पद आहे.”
Leave a Reply