
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातने काळ्या जादूच्या आणि अघोरी पूजेच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची सविस्तर चौकशी सध्या सुरू आहे. खरात प्रकरणातून आजच्या आधुनिक काळात काळी जादू आणि अघोरी कृत्यांवर विश्वास ठेवणारा समाज मोठ्या प्रमाणावर असल्याचे समोर आले आहे. अशी अनेक प्रकरणे सध्या महाराष्ट्रात घडताना पहायला मिळत आहेत. सांगलीतही आता अघोरी विद्येचा थरार पहायला मिळाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सांगलीत अघोरी विद्येचा थरार…
पुरोगामी महाराष्ट्रात विज्ञानाच्या युगातही अघोरी प्रथांचे पेव फुटले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शेणे येथील स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या सुमारास करणी आणि जादूटोण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, भोंदू बाबांविरोधात संताप व्यक्त होत आहे.
काळी बाहुली, लिंबू, सुया, नारळ…
शेणे येथील स्मशानभूमी परिसरात सकाळी काही नागरिकांना जादूटोण्याचे साहित्य आढळून आले. यात काळे कापड, टाचण्या टोचलेली काळी बाहुली, लिंबू, सुया, कोहळे आणि नारळ अशा वस्तू विखुरलेल्या अवस्थेत होत्या. वाळवा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांचे सत्र वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या घटनेने लोकांच्या मनातील शंका आणि भीती वाढली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
हा केवळ अज्ञानी लोकांना लुटण्याचा घंदा – अंनिस
या गंभीर प्रकारावर बोलताना अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी प्रशासनाला आणि भोंदू मांत्रिकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ‘कुठल्याही अघोरी कृत्याने कोणाचे भले किंवा वाईट होत नाही. हे केवळ अज्ञानी लोकांना लुटण्याचे धंदे आहेत. स्मशानभूमीत अशा अघोरी क्रिया करणारा तो मांत्रिक कोण आणि कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार झाला, याबाबत आता गावात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.’ दरम्यान, अंनिसने या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून, नागरिकांना भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Leave a Reply