
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. लाल कांद्यानंतर आता नव्याने बाजारात दाखल होत असलेल्या उन्हाळी कांद्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. लासलगावसारख्या आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजार समितीत कांद्याला अवघे ८ ते १२ रुपये किलो भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी केलेला खर्च वसूल करणेही कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे बळीराजाच्या आर्थिक अडचणीत मोठी भर पडली आहे.
कांद्याचे दर का घसरतात?
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा थेट परिणाम भारताच्या कांदा निर्यातीवर झाला आहे. आखाती देशांमधील मागणी घटल्याने व्यापाऱ्यांच्या गोदामांमध्ये मोठा साठा पडून आहे. तसेच या युद्धामुळे जागतिक स्तरावर कंटेनरच्या भाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. एकेकाळी ६०० डॉलरमध्ये उपलब्ध होणारा कंटेनर आता ६,५०० डॉलरपर्यंत महागला आहे, ज्यामुळे निर्यातीचे गणितच बिघडले आहे.
बाजारात आता मोठ्या प्रमाणात नवीन उन्हाळी कांदा दाखल होत आहे. तर दुसरीकडे, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील कांदा शेजारील राज्यांमध्ये स्वस्त दरात विक्रीसाठी उपलब्ध असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी झाली आहे. त्यासोबतच नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) मार्फत केल्या जाणाऱ्या खरेदीचे उद्दिष्ट यंदा ५ लाख मॅट्रिक टनावरून थेट २ लाख मॅट्रिक टनावर आणण्यात आले आहे, त्यामुळे बाजारातील अतिरिक्त साठ्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे.
बाजारपेठेतील स्थिती आणि भविष्यातील आव्हाने
वाशी एपीएमसी मार्केटमध्ये शनिवारी कांद्याचे घाऊक दर ८ ते १२ रुपयांच्या दरम्यान नोंदवले गेले. गेल्या दोन महिन्यांपासून सरासरी १२ ते १५ रुपयांवर असलेले दर आता खाली आल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
बाजार निरीक्षकांच्या मते, मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे दर ५० टक्क्यांनी कमी आहेत. विशेष म्हणजे, घाऊक बाजारात कांदा स्वस्त झाला असला तरी, मुंबईतील किरकोळ बाजारात तो २० ते २४ रुपये किलो या दराने ग्राहकांना मिळत आहे. दरम्यान आता ही युद्धजन्य परिस्थिती तशीच राहिल्यास आणि निर्यात पूर्ववत न झाल्यास, पुढील काळात कांद्याचे दर अजून खाली येण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.
Leave a Reply