
पाकिस्तान क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू सध्या बिग बॅश लीग 2025-26 स्पर्धेत खेळत आहेत. पण या खेळाडूंचा फॉर्म काही चांगला नाही. बाबर आझम असो की मोहम्मद रिझवान की शाहीन आफ्रिदी तिघंही या स्पर्धेत काही खास करू शकलेले नाहीत. शाहीन शाह आफ्रिदी बिग बॅश लीग स्पर्धेत ब्रिस्बेन हीट संघासोबत खेळत होता. ही स्पर्धा अजूनही संपलेली नाही. पण ही स्पर्धा अर्धवट सोडून शाहीन शाह आफ्रिदी मायदेशी परतला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला तडकाफडकी बोलवून घेतलं आहे. शाहीन शाह आफ्रीदीने त्या मागचं कारण सोशल मीडियावर एक पोस्ट करून सांगितलं आहे. शाहीन शाह आफ्रिदीला बिग बॅश लीग स्पर्धेत गुडघ्याच्या दुखापतीला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
27 डिसेंबरला ब्रिस्बेन हीट आणि एडिलेट स्ट्रायकर्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीला दुखापत झाली. स्ट्रायकर्सच्या डावातील 14 वं षटक शाहीन आफ्रिदी टाकत होता. तेव्हा त्याला उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत जाणवू लागली होती. त्यामुळे मैदानातून लंगतच बाहेर गेला आणि पुढे गोलंदाजी केली नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं टेन्शन वाढलं. कारण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा तोंडावर आहे. त्यासाठी फक्त एका महिन्याचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे शाहीन शाह आफ्रिदीचा फिटनेस खूपच महत्त्वाचा आहे. कारण पाकिस्तानचा टी20 संघाचा महत्त्वाचा आणि यशस्वी गोलंदाज आहे.
BREAKING: Shaheen Afridi will miss the remainder of #BBL15 due to a knee injury. pic.twitter.com/dY5Btfn396
— KFC Big Bash League (@BBL) December 30, 2025
शाहीन शाह आफ्रिदीने सोशल मिडिया हँडलवर स्पष्ट लिहिलं की, ‘ब्रिस्बेन हीट संघ आणि चाहत्यांनी मला जे प्रेम आणि पाठिंबा दिला त्याबाबत मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. अचानक दुखापत झाल्याने पीसीबीने मला परत बोलावलं आहे आणि मला रिहॅब घ्यावं लागेल. लवकरच मी मैदानात परतेन. तिथपर्यंत या शानदार संघाचा आत्मविश्वास वाढवत राहीन.’ शाहीन शाह आफ्रिदीचा बिग बॅश लीगमधील हे पहिलंच पर्व होतं. त्याने यात चार सामने खेळले. तसेच फक्त दोन विकेट घेण्यात यश आलं. त्याचा इकोनॉमी रेट हा 11.19 आहे. इतकंच काय तर मेलबर्न रेनेगेड्सविरुद्धच्या सामन्यात दोन बीमर टाकल्याने त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखलं होतं.
Leave a Reply