
Sharad Pawar : खासदार शरद पवार हे कसलेले आणि मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांच्या राजकीय डावपेचांचा आवाका भल्याभल्यांना येत नाही. सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीच धूम आहे. या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील अंदाज घेऊन युती आणि आघाड्यांचे गणित आखले जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी गटाची मोठी ताकद आहे. त्यामुळेच या दोन्ही महानगरपालिकांसाठी अजित पवार यांनी केलेले बंड विसरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू होती. एकीकडे महापालिका निवडणुकीमुळे वातावरण तापलेले असतानाच बारामतीत एका कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार हे माझे मेंटॉर आहेत, असे जाहीर विधान केले. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने घडत असलेल्या घडामोडी आणि गौतम अदानी यांनी केलेले विधान या दोन्ही गोष्टींचा आधार घेत काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
शरद पवार एनडीएमध्ये सामील होणार?
चंद्रपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना विजय विडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्योगपती अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार NDA मध्ये सामील होण्याची शक्यता आहे, असं भाकीत वडेट्टीवार यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत खासदारांची गरज आहे. शरद पवार यांच्याकडेही आमदार कमी आहेत. पुण्यात दोन्ही गट एकत्र आल्याने एकत्रीकरणाची पहिली पायरी गाठण्यात आली हे स्पष्ट झाले आहे, असाही मोठा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. सोबतच पुण्यातील ही युती स्थानिक स्तरावरची तात्पुरती युती ठरते का याकडे सर्वांचे लक्ष आहे असे म्हणत त्यांनी भविष्यात काहीतरी घडणार असलयाचे संकेत दिले आहेत.
भविष्यात नेमकं काय होणार?
दरम्यान, पुणे तसेच पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींमध्ये युतीसाठी चर्चा चालू होती. पिंपरी चिंचवडमध्ये हे दोन्ही पत्र एकत्र निवडणूक लढवणार आहेत. परंतु पुण्यामध्ये चर्चा फिस्कटली आहे. असे असतानाच विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानानंतर भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply