
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी युती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. दोन्ही राष्ट्रवादीची युतीची चर्चा सुरू असताना आता अजित पवारांनी आता एका नव्या पक्षासोबत युती करण्याची तयारी केली आहे. हा पक्ष कोणता याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अजित पवारांची सोशल मीडिया पोस्ट
अजित पवार पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) सोबत युती करण्याची शक्यता आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करताना अजित पवार यांनी लिहिले की, ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे अध्यक्ष सचिन खरातजी यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सन्मानपूर्वक आघाडी करून काही जागांवर सहमती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी त्यांची एकत्र येण्याची भूमिका स्वागतार्ह आहे. लोकहिताच्या मुद्द्यांवर समान विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन काम करणं, ही काळाची गरज आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक चर्चा आणि समन्वयातून पुढील वाटचाल निश्चितच सकारात्मक ठरेल, असा मला विश्वास आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे अध्यक्ष श्री. सचिन खरात जी यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सन्मानपूर्वक आघाडी करून काही जागांवर सहमती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत एकत्र निवडणूक लढवण्याची… pic.twitter.com/f4WezbCsrw
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 26, 2025
सचिन खरात काय म्हणाले?
अजित पवारांसोबत झालेल्या भेटीनंतर बोलताना सचिन खरात यांनी म्हटले की, RPI खरात हा पक्ष शरद पवार यांच्या सोबत आहे. आता निवडणुका होत आहेत. अजित पवार यांचा पक्ष शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. जे पक्ष या विचारांवर चालतात ते पक्ष एकत्रित यावं अस सगळ्यांचे मत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासाठी चर्चा सुरू आहेत. यासाठी अजित पवारांची आज भेट घेतली. दादांची भेट घेऊन मी त्यांच्याशी बोललो आहे. आपण समविचारी लोक एकत्रित येऊया अस आमच देखील मत आहे.
पुढे बोलताना सचिन खरात म्हणाले की, तुमचा पक्ष देखील फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानतो असं मी दादांना सांगितलं. आमचा आणि अजित पवारांचा विचार एकच आहे. आम्हाला जर सन्मानपूर्वक जागा दिल्या तर आम्ही अजित पवारांसोबत आघाडी करण्यास तयार आहोत. मी अजित पवारांना पत्र देखील दिल आहे. राज्यात मी पवार साहेबांच्या पक्षासोबत आहे आणि राहणार. पण पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार आमच्या पक्षाला सन्मानपूर्वक जागा देत असतील तर आम्ही विचार करू आणि निवडणुका सोबत लढू.
Leave a Reply