
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. श्रीमंत असण्यासोबतच ते दानशूर देखील आहेत. तुम्ही अनेकदा याबाबत माहिती वाचलेली असेल. अशातच आता मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नीता यांनी दिवंगत वडील रवींद्रभाई दलाल यांना समर्पित ‘जीवन’ या नवीन कर्करोग आणि डायलिसिस केंद्राचे उद्घाटन केले आहे. यामुळे आगामी काळात लाखो लोकांना फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जीवन केंद्राचे उद्घाटन
नीता अंबानी या असे अनेक उपक्रम चालवत असतात, ज्यामुळे सामान्य नागरिकांना थेट फायदा होत असतो. ‘जीवन’या केंद्रात एक बालरोग केमोथेरपी वॉर्ड आहे जो खास पद्धतीने डिझाइन केलेला आहे. प्रत्येक मुलाला मायेची उब, आराम आणि भावनिक आधार असलेले उपचार मिळायला हवेत यासाठी याची रचना केलेली आहे.
जीवन या केंद्राचे उद्घाटन नीता अंबानी यांनी त्यांचे पती मुकेश अंबानी यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी इतरही मान्यवर उपस्थित होते. या केंद्रात केमोथेरपी, डायलिसिस, इम्युनोथेरपी आणि इतर विशेष वैद्यकीय सेवा मिळणार आहेत. ‘जीवन’ मध्ये बालरोग केमोथेरपीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रुग्णांच्या सुरक्षेसाठी 24/7 विशेष क्रिटिकल केअर युनिट तैनात असणार आहे. याचा फायदा सामान्य लोकांना होणार आहे.
मुंबईत बनणार 2000 बेडचे रुग्णालय
रिलायन्स फाउंडेशनच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी फाउंडेशनच्या कामाची माहिती दिली. ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रातील फाउंडेशनचे उपक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत असं त्यांनी सांगितले. पुढे बोलताना नीता अंबानी यांनी ऐतिहासिक घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, रिलायन्स फाउंडेशन मुंबईत एक आधुनिक, 2000 बेडची मेडिकल सिटी तयार करत आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ही सिटी देशातील सर्वात मोठ्या खाजगी आरोग्य सेवा प्रकल्पांपैकी एक असेल. हे केवळ एक रुग्णालयच नाही तर एआय-आधारित उपचार करणारे केंद्र असणार आहे. या सिटीमध्ये प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाचे डॉक्टर असणार आहेत. या मेडिकल सिटीमध्ये भविष्यातील आरोग्यसेवा व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी एक वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे.
Leave a Reply