
अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे बैठक झाली. दोन्ही देशांतील युद्ध कायमचे थांबवण्यासाठी तसेच एकमेकांच्या मागण्या ठेवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु ही बैठक निष्फळ ठरल्याने अमेरिका आक्रमक झाली आहे. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरात नाकेबंदी करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, आता अमेरिकन सैन्य होर्मुझच्या सामुद्रधुनीत गस्त घालणार असल्याने संपूर्ण जगावर पुन्हा एकदा इंधन टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. तसेच अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात पुन्हा युद्ध सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इस्लामाबादमध्ये फिस्कटलेल्या या चर्चेचा काही प्रमाणात भारतावरही परिणाम पडणार आहे. याबाबत इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली यांनीच सांगितले आहे. आम्ही अमेरिकेसोबत अजूनही चर्चा करण्यास तयार आहोत, असे फथाली यांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील बैठक निष्फळ ठरल्यानंतर फथाली यांनी वरील मत व्यक्त केले आहे. तसेच आम्ही चर्चेस तयार आहोत, फक्त अमेरिकेने कोणतीही बेकायदेशीर अट घालू नये, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.
दुसरीकडे इस्लामाबदची चर्चा फिस्कटल्यानंतर पश्चिम आशियातील परिस्थिती ही भारत-इराणच्या संबंधांवर परिणाम पाडणारी आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. म्हणजेच पश्चिम आशियातील स्थितीमुळे भारतापुढे संकट निर्माण होऊ शकते, असे म्हटले जात आहे.




Leave a Reply