
राजस्थानमधील सालासर रोडवर झालेल्या एका भीषण रस्त अपघातात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जात असताना भाविकांच्या गाडीला समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?
कामठी येथील कचरीपुरा भागात राहणारे पारसे कुटुंब आणि त्यांचे काही नातेवाईक एका तवेरा गाडीने राजस्थानमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. सालासर रोडवर प्रवास करत असताना अचानक त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप गाडीने भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की तवेरा गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात महादेव पारसे, त्यांच्या पत्नी कांता पारसे आणि मुलगा घनश्याम पारसे यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातात चालक मनोज चिंदमवार यांच्यासह आराधना पारसे, पायल पारसे, पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे आणि पवन बागडे हे ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने सालासर येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची बातमी कामठीतील कचरीपुरा परिसरात पोहोचताच संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Leave a Reply