
नाशिकमधील स्वयंघोषित ‘कॅप्टन’ आणि भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातच्या SIT (विशेष तपास पथक) चौकशीत एकामागून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. धार्मिक विधी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि श्रद्धेचा गैरवापर करणाऱ्या खरातने अनेक वर्षे भोंदूगिरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. आता त्याने तुरुंगात स्वत: बद्दलच मोठी भविष्यवाणी केली आहे.
यापूर्वी अशोक खरातने त्याला अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांचे भविष्य सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी त्याला चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर आता पुन्हा खरात बरळताना दिसत आहे.
चौकशीदरम्यान अशोक खरातने स्वतःच आपले भविष्य सांगितल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने स्वत:चे भविष्य सांगताना “माझं मरण इथेच आहे” असे म्हटले आहे.
अशोक खरातवर आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी अनेक गुन्हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत. SIT च्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरात धार्मिक विधी, जादूटोणा आणि दैवी शक्ती दाखवण्याच्या नावाखाली महिलांना आपल्या कार्यालयात बोलावत असे. त्यांना कुटुंबातील मृत्यू, बदनामी किंवा इतर संकटांची भीती दाखवून लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत.
खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात लपवलेल्या कॅमेऱ्यांद्वारे अनेक महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले गेले. पेन ड्राईव्हमध्ये ५८ महिलांसोबतच्या अश्लील व्हिडिओ क्लिप्स मिळाल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. हे व्हिडिओ ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जात असल्याचेही तपासात उघड झाले.




Leave a Reply