
उन्हाळी सुट्टी आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तसेच पर्यटकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि गोवा येथील मडगाव स्थानकादरम्यान विशेष वातानुकूलित गाड्यांच्या ४ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे नियमित गाड्यांमधील वेटिंग लिस्टचा त्रास कमी होऊन प्रवाशांना सुखकर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक
१. गाडी क्रमांक ०११२९ (CSMT – मडगाव विशेष):
- कधीपासून कधीपर्यंत: १० एप्रिल आणि १४ एप्रिल २०२६.
- वेळ: मुंबई (CSMT) येथून रात्री १२:२० वाजता प्रस्थान.
- आगमन: मडगाव (गोवा) येथे त्याच दिवशी दुपारी ०३:१५ वाजता.
२. गाडी क्रमांक ०११३० (मडगाव – CSMT विशेष):
- कधीपासून कधीपर्यंत : १० एप्रिल आणि १४ एप्रिल २०२६.
- वेळ: मडगाव येथून सायंकाळी ०४:०० वाजता प्रस्थान.
- आगमन: मुंबई (CSMT) येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०३:४५ वाजता.
एसी विशेष रेल्वे सुरु करणार
या विशेष रेल्वेची रचना पूर्णपणे वातानुकूलित असणार आहे. यामध्ये १८ वातानुकूलित तृतीय श्रेणी इकॉनॉमी (AC 3-Tier Economy) डबे असणार आहेत. या डब्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रवाशांना कमी दरात वातानुकूलित प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. याव्यतिरिक्त सुरक्षेसाठी आणि तांत्रिक गरजांसाठी २ जनरेटर व्हॅन जोडल्या जातील.
कोणकोणत्या स्थानकात थांबा?
कोकणातील जास्तीत जास्त प्रवाशांना फायदा व्हावा, या दृष्टीने या गाडीला २३ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे:
मुंबई : दादर, ठाणे, पनवेल.
रायगड : पेण, रोहा, माणगाव, वीर.
रत्नागिरी : खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे.
सिंधुदुर्ग : राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.
गोवा: थिविम आणि करमळी.
आरक्षण प्रक्रिया
यातील गाडी क्रमांक ०११२९ साठीचे आरक्षण आधीच खुले करण्यात आले आहे. इच्छुक प्रवासी रेल्वेच्या अधिकृत IRCTC संकेतस्थळावर किंवा कोणत्याही रेल्वे आरक्षण केंद्रावर (PRS) जाऊन आपली तिकिटे बुक करू शकतात.
रेल्वे प्रशासनाच्या मते, मे महिन्याच्या सुट्ट्या आणि उन्हाळ्याचा वाढता पारा पाहता प्रवाशांना आरामदायी प्रवासाची गरज असते. या विशेष गाड्यांमुळे कोकण रेल्वेवरील नियमित गाड्यांवरील भार हलका होईल. दरम्यान, स्थानिक प्रवाशांनी आणि रेल्वे संघटनांनी भविष्यात अशाच प्रकारच्या अधिक गाड्या कायमस्वरूपी सुरू कराव्यात, अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे.
Leave a Reply