
इराण आणि अमेरिकेतील युद्ध थांबले आहे, त्यामुळे मध्यपूर्वेतील देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली आहे. आता युद्धविराम झाल्यानंतर अमेरिकन सैनिकांनी ट्रम्प सरकारबाबत खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. युद्धादरम्यान कुवैतमधील बेसवर तैनात असलेल्या सैनिकांनी अमेरिकन मिडिया सीबीएसला एक मुलाखत दिली. यात त्यांनी युद्धाच्या काळातील अनुभव सांगितले आहेत. हे तेच सैनिक आहेत, जे कुवैत बेसवर हल्ल्या झाला त्यावेळी थोडक्यात बचावले होते. या हल्ल्यात अमेरिकेच्या 6 सैनिकांचा मृत्यू केला होता.
इराणने अमेरिकेची जिरवली
इराणच्या कुवैतमधील बेसवर झालेल्या हल्ल्यात अमेरिकेचे मोठे नुकसान झाले होते, यात 6 सैनिकांचा मृत्यू झाला होता. मात्र अमेरिकेने हे अपयश आहे असं मान्य केलं नव्हतं. मात्र आता सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत सैनिकांनी प्रत्यक्षात आपला पराभव मान्य केला आहे. त्यांनी सांगितले की, हा एअर स्ट्राईक इराणने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केला होता आणि त्यातून बचाव करणे शक्यच नव्हते. इराणसाठी ही मोठी यशस्वी कारवाई होती. त्या दिवशी आम्हाला मोठा फटका बसला.
सैनिकांनी मुलाखत का दिली?
पीट हेगसेथ यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले होते की, कुवैतमधील हा बेस सुरक्षित होता. मात्र एक ड्रोन चुकून आत शिरल्यामुळे नुकसान झाले होते. यावर भाष्य करण्यासाठी जखमी सैनिकांनी ही मुलाखत दिली. मात्र या सैनिकांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. कुवैतमधील या बेसवर अमेरिकन सेनेची 103 वी सस्टेनमेंट कमांड तैनात होती. एका सैनिकाने सांगितले की, ‘या हल्ल्याची माहिती आम्हाला आधीपासून होती. इराण या बेसवर हल्ला करू शकतो अशी माहिती गुप्तचर अहवालातून मिळाली होती, मात्र या बाबीला कुणीही गांभीर्याने घेतले नाही.’
6 जणांचा मृत्यू
जखमी सैनिकाने पुढे बोलताना सांगितले की, ‘सकाळी आम्ही दारुगोळ्याबाबत माहिती गोळा करत असताना अचानक शाहेद ड्रोनद्वारे जोरदार हल्ला झाला. यात 6 सैनिक जागीच ठार झाले आणि 20 जण जखमी झाले. सगळीकडे आग लागली होती.’ दरम्यान, हा हल्ला 1 मार्च रोजी झाला होता, याच काळात अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केली होती. त्यामुळे इराणने आक्रमक होत हा हल्ला केला होता.
सैनिकांकडून पोलखोल
आणखी एका सैनिकांनी अमेरिकेची पोलखोल करताना म्हटले की, ‘संरक्षण मंत्र्यांनी केलेला बेस सुरक्षित होता हा दावा चुकीचा आहे. तिथे फक्त एक भिंत होती, जी समोरासमोरच्या गोळीबारात उपयोगी पडू शकते. मात्र हवाई हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी कोणतीही सुविधा नव्हती. आम्ही सुमारे 60 सैनिक मोकळ्या मैदानात होतो.’
Leave a Reply