
तिच्या पाऊलवाटेवर काटे होते, पण डोळ्यांत स्वप्नं होती..पराकोटीचा विरोध सहन केला तिने पण, ज्ञानाचा दिवा विझू दिला नाही. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिद्दीला, संघर्षाला आणि दूरदृष्टीला वंदन करणारी स्टार प्रवाहची ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’च्या सेटचा भव्य दिव्य अनावरण सोहळा नुकताच पार पडला. या खास प्रसंगी मालिकेचे निर्माते तसेच महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे, सावित्रीबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी गोखले, स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे आणि मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.
या अनावरण सोहळ्याने केवळ एका सेटचा पडदा उघडला नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातील एका जाज्वल्य विचारक्रांतीचा पुनर्जन्म झाला. स्त्री शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य अखंडपणे झिजवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या संघर्ष, त्याग आणि धैर्याची साक्ष देणारा हा सेट त्या काळातील सामाजिक वास्तव, असह्य वेदना आणि नव्या उद्याची आशा यांचं जिवंत चित्र उभं करतो. प्रत्येक भिंत, प्रत्येक रचना आणि प्रत्येक तपशील त्या काळातील संघर्षकथांना शब्द देतो. या भव्यदिव्य सेटमधून सावित्रीबाईंच्या पावलांखालील काटे, समाजाने उभे केलेले अडथळे आणि तरीही न डगमगता पुढे जाणारी त्यांची जिद्द ठळकपणे जाणवते. प्रेक्षक केवळ एक दृश्य पाहत नाहीत, तर त्या काळात प्रवेश करतात जिथे अज्ञानाच्या अंधारात शिक्षणाचा दिवा पेटवण्याचं धाडस एका स्त्रीने केलं होतं. हा ऐतिहासिक आणि भावस्पर्शी सेट कलादिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून आणि कल्पकतेतून साकारला गेलाय.
याप्रसंगी मधुराणी गोखले आपली भावना व्यक्त करताना म्हणाल्या, “सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. इतकं आभाळा एवढं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं मोठी जबाबदारी आहे. आज आपण मुक्तपणे शिकत आहोत, आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम करत आहोत, अभिमानाने मिरवत आहोत. पण त्यासाठी दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला. मला सगळ्यांच्या वतीने सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अश्या संमिश्र भावना आहेत. प्रेक्षकांनी साथ द्यावी हीच अपेक्षा आहे.”
View this post on Instagram
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “कलाकार म्हणून माझं भाग्य आहे की वेगवेगळ्या लार्जर दॅन लाईफ भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणं हे एक वेगळं आव्हान आहे. विचारांची धगधगती मशाल म्हणजे महात्मा जोतीराव फुले. व्यवस्थेला प्रश्न विचारायची सुरुवात महात्मा फुलेंनी केली. अश्या क्रांतीकाराचे विचार पोहोचवणं ही मोठी जबाबदारी आहे. स्टार प्रवाहसोबतचं नातं खूप खास आहे. माझ्या आयुष्याला ज्या भूमिकेने कलाटणी दिली ती ‘राजा शिवछत्रपती’ मालिका मी स्टार प्रवाहसोबत केली. जवळपास 17 वर्षांनंतर आता स्टार प्रवाहसोबत फक्त अभिनेता म्हणून नाही तर निर्माता म्हणून देखिल काम करणार आहे. मी या मालिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं समाजाप्रती जे योगदान आहे ते शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य आहे. आज उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा जर कुणी असतील तर त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत. त्यामुळे सावित्रीबाईंचा इतिहास मालिकेतून साकारणं माझ्यासाठी अत्यंत भावनिक गोष्ट आहे.”
या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे यांनी सांगितलं, “ही मालिका केवळ एक कथा नाही, तर समाजाला विचार करायला लावणारा प्रवास आहे. स्टार प्रवाहवरून असा आशयघन इतिहास मांडताना आम्हाला अभिमान वाटतो. सावित्रीबाई संसार सांभाळून समाजपरिवर्तनाची लढाई लढल्या. त्यांच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री समाजात मानाने जगू शकते. अशा महान क्रांतिज्योतीची कथा मांडणं क्रमप्राप्त होतं. माझी खात्री आहे की ही मालिका समस्त मालिका विश्वात मैलाचा दगड ठरेल.” ‘
Leave a Reply