• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अखेर काळाने ती संधी हिरावली, आशा भोसले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली मोठी खंत

April 12, 2026 by admin Leave a Comment


भारतीय संगीत विश्वातील चैतन्यमय आवाज आणि सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीवर आणि संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून थकवा आणि छातीतील संसर्गाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना ११ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर आज दुपारी ‘मल्टी ऑर्गन फेल्युअर’मुळे त्यांचे निधन झाले. त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली.

आशा भोसले यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. उद्या, १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता दादर येथील शिवाजी पार्कात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला खात्री होती की लतादीदींची आम्हाला १०० वी करता आली नाही. पण आशा ताईंची १०० वी निश्चित पणे करु, पण दुर्दैवाने काळाने ती संधी दिली नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मंगेशकर कुटुंबियांतील दुसरा तारा आशा भोसले ताई यांचे निधन झालेले आहे. ९२ वर्ष त्या जगल्या त्यातल्या बहुतांश काळ वयाच्या ५ ते ६ वर्षांपासून त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा केली. या देशात सर्वात वर्सटाईल गायिका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आशाताईंनी तोरा मन दर्पण कहलाये असे गाणं म्हटलं. त्याचसोबत अतिशय आधुनिक खतुबा सारखं गाणंही तेवढ्याच लिलया त्यांनी म्हटलं. शास्त्रीय संगीत, पॉप, रॉक, भावगीत जेवढे जॉनर आहेत, तसेच २० पेक्षा जास्त भाषांमध्ये आशाताईंनी गाणी म्हटली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जगातील एक वेगळे उदाहरण असं होतं की ९० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तीन तास कॉन्सर्ट करणाऱ्या आशाताई होता. आम्ही जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, त्यावेळी त्यांच्या जीवनचा जो प्रवास त्यांनी सांगितला. कितीतरी खडतर आयुष्य जगत त्या इथपर्यंत पोहोचल्या, हे प्रेरणादायी होते. मला आठवत की आम्ही जो रेडिओ जॉकीचा कार्यक्रम घेतला होता, त्या कार्यक्रमात आशाताईंनी मला दोन ओळी गुणगुणायला लावल्या. मग सांगितलं की बघा माझी शक्ती मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यालाही गायला लावू शकते, असे अतिशय जिंदादिल त्यांचे व्यक्तीमत्त्व होते, अशी खास आठवण देवेंद्र फडणवीसांनी सांगितली.

कुठल्याही कार्यक्रमाचा प्राण त्या असायच्या. सतत आशाताई हसतमुख आणि उत्साहात असायच्या. वयाच्या ९०, ९१ आणि ९२ सालातही त्यांचा उत्साह वाखण्याजोगा होता. आम्हाला खात्री होती की लतादीदींची आम्हाला १०० वी करता आली नाही. पण आशा ताईंची १०० वी निश्चित पणे करु, पण दुर्दैवाने काळाने ती संधी दिली नाही. आशाताईंसारख्या सुविख्यात जगप्रसिद्ध आणि ईश्वरीय आवाज असलेल्या एक गायिका आमच्यातून निघून गेल्या. मी त्यांना विनम्र श्रद्धांजील अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात आपण सर्व सहभागी आहोत. आज संगीताकरिता आजचा दिवस अत्यंत दु:खद आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सुनेत्रा पवारांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आशा भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले.

आशा भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आपल्या कर्तृत्वाने संगीत क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरही विशेष ओळख मिळाली होती. आशा भोसले यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याकडून शोक व्यक्त

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. आशाजींना संगीत विश्वातील एक सिद्धहस्त आणि प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व संबोधत, राज्यपालांनी त्यांच्या आठ दशकांच्या अवीट कारकिर्दीचे आणि सांस्कृतिक योगदानाचे स्मरण केले. ‘जो भी है बस यही एक पल है’ हे गीत त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान होते, असे नमूद करून, त्यांच्या जाण्याने संगीत विश्वाचे आणि विशेषतः महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरेंकडून दुःख व्यक्त 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला. त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते,लता दीदी यांच्या नंतर त्या संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाच्या स्तंभा प्रमाणे उभ्या होत्या, भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला, त्यांचे गाणे हेच त्यांचे अमरत्व राहील. त्यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB Live Streaming : रोहित-विराटच्या सामन्याच्या वेळेत बदल? मुंबई-आरसीबी मॅच किती वाजता?
  • मोटोरोलाच्या ‘या’ अप्रतिम फोनमध्ये चार 50MP कॅमेरे आणि 5200mAh बॅटरी, जाणून घ्या किंमत
  • आशाताई द लास्ट एम्परर… भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा घटक आपल्यातून गेला, राज ठाकरे यांची भावूक पोस्ट
  • उन्हाळ्यात ‘या’ 7 पद्धतीने साठवा कांदे-बटाटे, खराब होण्याचा सवालच नाही !
  • IPL 2026, GT vs LSG : नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने, गोलंदाजी घेत गिल म्हणाला की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in