
‘धुरंधर’च्या यशानंतर अभिनेता अक्षय खन्नाचं नाव त्याच्या आगामी चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. त्याच्या पुढील प्रोजेक्ट्समध्ये अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’चाही समावेश आहे. परंतु शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच त्याने या चित्रपटातून माघार घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर अक्षयने चित्रपट सोडल्याने निर्माते त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. यशाची हवा त्याच्या डोक्यात गेली आहे, अशा शब्दांत निर्माते कुमार मंगत पाठक यांनी सुनावलं. इतकंच नव्हे तर त्यांनी त्याला कायदेशीर नोटीससुद्धा बजावली आहे. आता या संपूर्ण वादादरम्यान ‘दृश्यम’ फ्रँचाइजीमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणची प्रतिक्रिया समोर आली आहे.
दिग्दर्शक अभिषेक पाठकने ‘दृश्यम 2’चं दिग्दर्शन केलं होतं, त्यानंतर आता तिसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने अक्षय खन्नाच्या एक्झिटबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अजय देवगण त्याला काय म्हणाला, याचाही खुलासा त्यान केला आहे. “सर्वकाही ठरलं होतं आणि अक्षय खन्नाला चित्रपटाची कथासुद्धा फार आवडली होत. त्याच्या भूमिकेचा लूक आणि कॉस्च्युमसुद्धा तयार झाला होता. परंतु ‘धुरंधर’च्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधी त्याने ‘दृश्यम 3’ला नकार देत माघार घेतली. याप्रकरणी जेव्हा माझं अजय देवगणशी बोलणं झालं, तेव्हा त्याने आमच्यावर सर्व निर्णय सोपवला. काय करायचं हे तुम्हीच पाहून घ्या, असं तो म्हणाला. तसंही हे माझ्या आणि निर्मात्यांदरम्यानचं प्रकरण आहे”, असं अभिषेकने स्पष्ट केलं.
“दृश्यम 2 च्या आधारेच तिसऱ्या भागाची कथा पुढे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे भूमिकांचा लूक ऐनवेळी बदलला जाऊ शकत नाही. अशातच हेअर विगची अक्षयची मागणी अनावश्यक होती. मी त्याला चॅलेंज देतो की त्याने भविष्यात सोलो चित्रपट करून दाखवावा”, असं आव्हान दिग्दर्शकाने अक्षयला दिलं. त्याचसोबत ‘दृश्यम 3’साठी अक्षय खन्नाने 21 कोटी रुपये मानधन मागितल्याच्या चर्चा अभिषेकने फेटाळल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘दृश्यम 3’चा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Leave a Reply