
राज्यातील थंडीचा कडाका काही अंशी कामी झाला असला तरी गारवा अजूनही आहे. राज्यातील काही भागांत तापमान काही अंशांनी वाढल्याने उबदारपणा आला असून थंडीने कुडकुडणाऱ्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. दरम्यान भारताच्या बहुसंख्य भागात हिवाळा आपली पावलं रोवत असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) अनेक प्रदेशांमध्ये थंडीची लाट, दाट धुके आणि बर्फवृष्टी यासाठी नवीन अलर्ट जारी केले आहेत. तसेच वाहतूक विस्कळीत होण्याचा आणि तापमानात आणखी घट होण्याचा इशारा दिला आहे.
राजधानी दिल्लीत दाट धुक्याची चादर पसरली आहे, ज्यामुळे दैनंदिन जीवन आणि विमान प्रवास विस्कळीत झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून, सततचे धुके आणि धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
दाट धुके आणि शीतलहरींचा इशारा
आयएमडीच्या अलर्टनुसार, 19 आणि 20 डिसेंबर रोजी पंजाबमध्ये काही ठिकाणी आणि 19 ते 21 डिसेंबर दरम्यान हरियाणा आणि चंदीगडमध्ये पहाटेच्या वेळी दाट ते खूप दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर 21, 24 आणि 25 डिसेंबर रोजी पंजाबच्या काही भागात आणि 22, 24 आणि 25 डिसेंबर रोजी हरियाणा आणि चंदीगडमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच 19 ते 21 डिसेंबर दरम्यान उत्तर प्रदेशात काही ठिकाणी पहाटे दाट ते खूप दाट धुके पडण्याची शक्यता आहे. 22 ते 25 डिसेंबर दरम्यान राज्यातील काही ठिकाणी दाट धुकं पडू शकतं.
बिहारमध्ये 21 आणि 22 डिसेंबर रोजी काही ठिकाणी पहाटे दाट धुके पडण्याची शक्यता आहे, तर 19 आणि 20 डिसेंबर रोजी झारखंड आणि ओडिशातील काही भागांत, 20 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालमध्ये आणि इतर ठिकाणी दाट धुकं अनुभवायला मिळू शकतं. तसेच उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी 19 आणि 20 डिसेंबरला अती तीव्र थंड दिवसांची शक्यता आहे, तर 19 आणि 20 डिसेंबर रोजी उत्तराखंडमधील काही ठिकाणीही असेच हवामान असण्याचाअंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कशी असेल स्थिती ?
दरम्यान महाराष्ट्रातही काही भागांत थंडीच्या लाटा अनुभवयास मिळतील, तर काही भागांत मात्र कोरडे हवामान असेल. मुंबई व उपनगरांमध्ये आकाश निरभ्र असेल, कमाल तापमान 18 तर किमान तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत असू शकेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या तापमानात काही अंशानी वाढ होऊ शकते.
सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये काही अंशांनी वाढ होण्याची शक्यता असल्याने गारवा कमी होईल. असं असलं तरी पुण्यात सकाळच्या वेळी धुकं दिसे, इथलं किमान तापमान 10 अंशांपर्यंत राहील.
दरम्यान उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पुण्यातही तापमानाचा पारा चांगलाच खाली गेलेला पाहायला मिळत आहे. आणखी पुढील काही दिवस तापमानात घट होऊ शकते अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. थंडीच्या वातावरणात आहे व्यायाम आरोग्यासाठी अधिक पोषक असल्याने अनेक नागरिक व्यायामासाठी घराबाहेर पडत आहेत.
उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका थोडासा कमी झाला आहे. नाशिकमध्ये 9 अंश सेल्सिअस तर जळगावमध्ये ही किमान तापमान 9 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही किमान तापमानाचा पारा 9 ते 10 अंशाच्या दरम्यान असेल.
खराब हवेमुळे पुणे पालिकेला जाग
दरम्यान खराब हवेमुळे पालिकेला जाग आली असून गुणवत्ता तपासणी यंत्र बसवण्याचे आदेश बांधकाम प्रकल्पांना देण्यात आले आहेत. पुणे शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर आधारित हवेची गुणवत्ता तपासणी यंत्रणा बसविण्याबाबत बंधनकारक केले आहे. संबंधित सेन्सर हे ठरवून दिलेल्या तांत्रिक निकषानुसार व मान्यताप्राप्त उत्पादकाकडूनच घ्यावेत, सेन्सर यंत्रणा तातडीने बसवावी, त्याकडे दुर्लक्ष केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा पालिका प्रशासनाने दिलाय.
Leave a Reply