
देशांतर्गत वनडे क्रिकेट स्पर्धा अर्थात विजय हजारे ट्रॉफी 2025-26 सुरु आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीचे सामने पार पडले असून दुसर्या सामन्यांसाठी संघाची तयारी सुरू आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या स्पर्धेत खेळत असल्याने या स्पर्धेचं महत्त्व वाढलं आहे. ते खेळत असलेले सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी आतुर आहेत. दोघांनी पहिल्या वनडे सामन्यात शतकं ठोकली. पण त्यांचा हा खेळ अनेकांना पाहता आला नाही. मैदानात उपस्थित असलेले प्रेक्षकच या सामन्याचा आनंद लुटू शकले. त्यामुळे अनेकांनी बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली. दिग्गज क्रिकेटपटू खेळत असूनही त्याचं लाईव्ह टेलिकास्ट न केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. रोहित शर्मा मुंबईकडून, तर विराट कोहली दिल्लीकडू खेळला. पण त्यांचा खेळ चाहत्यांना टीव्हीवर पाहता आला नाही. या मागचं कारण आर अश्विनने उघड केलं आहे.
आर अश्विनने युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘प्रत्येक जण रोहित आणि विराटला खेळताना पाहू इच्छित आहे. हे तर निश्चित आहे. पण आम्हाला हे पाहावं लागेल की रोहित आणि विराटच्या खेळण्याची माहिती किती लवकर मिळाली? आंतरराष्ट्रीय कॅलेंडर प्रसिद्ध होताच देशांतर्गत कॅलेंडर प्रसिद्ध केले जाते. ते अंतिम झालं की, बीसीसीआय आणि प्रसारकर ठरवतात की कोणते सामने दाखवले पाहीजेत. तसेच कोणते सामने दाखवणं सोयीचं ठरेल.’ आर अश्विनने पुढे सांगितलं की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा या स्पर्धेतील सहभाग काही निश्चित नव्हता. त्यामुळे शेवटच्या क्षणी बदल करणं कठीण झालं. दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळत असलेला दुसऱ्या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं शतक
रोहित शर्माने मुंबईकडून आणि विराट कोहलीने दिल्लीकडून शतकी खेळी करत आपआपल्या संघाला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने सिक्कीमविरुद्ध 94 चेंडूत 155 धावा केल्या. त्यात त्याने 18 चौकार आणि 9 षटकार मारले. तर विराट कोहलीने आंध्र प्रदेशविरुद्ध 101 चेंडूत 131 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले.
Leave a Reply