
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावर मोठे विधान केले आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना दानवे यांनी, उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक असेल असे म्हटले आहे. दानवे यांच्या मते, ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केल्याने त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत याचा परिणाम दिसून आला होता आणि आता या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते आपापल्या सोयीने दुसऱ्या पक्षांत जातील, असा दावा त्यांनी केला आहे. हा पक्ष आता शेवटची निवडणूक लढवत असून, पुढील निवडणुकीला राहणार नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Leave a Reply