
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जवळपास 18 वर्षांनंतर एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन समीकरण तयार झाले आहे. या युतीमुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मोठे बदल अपेक्षित आहेत. राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मंचावर आदित्य आणि अमित ठाकरें सह रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंचे एकत्र फोटोसेशन झाले, यातून ठाकरे कुटुंब एक झाल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या युतीला अस्तित्व टिकवण्याची धडपड संबोधत टीका केली.
तर, उद्धव ठाकरे यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना राजकारणातून संपवण्याचा इशारा दिला. जागावाटपाबाबत गुप्तता पाळण्यात आली असली तरी, सूत्रांनुसार ठाकरे गटाला 130-135, मनसेला 70-75 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 18-20 जागा मिळण्याची शक्यता आहे. या युतीमुळे आता ठाकरे बंधू आणि भाजप-शिंदे यांच्या महायुतीमध्ये थेट सामना रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना हिंदुत्वावरून लक्ष्य केले असून, या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी येण्याची चिन्हे आहेत.
Leave a Reply