
सिंदखेड राजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी 21 वर्षीय सौरभ तायडे यांची निवड झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील या महत्त्वाच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) युवा नेतृत्वाला संधी दिली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सौरभ तायडे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे नगराध्यक्ष ठरले आहेत. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, तसेच स्थानिक राजकारणात युवाशक्तीला मिळालेल्या संधीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या विजयानंतर बोलताना सौरभ तायडे यांनी पक्षाचे आभार मानले. “एवढ्या तरुण मुलावर विश्वास ठेवून पक्षाने जी जबाबदारी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम पक्षाचे आभार मानतो,” असे ते म्हणाले.
आपल्या वयावरून टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. “विरोधकांचे म्हणणे होते की, 21 वर्षांच्या तरुणाला काय समजेल, अनुभव नाही, काही नाही. पण माझा प्रश्न आहे की, त्यांनी इतका अनुभव असूनही इतकी वर्षे गावाचा विकास का केला नाही?” असे तायडे यांनी विचारले. आता विकासाचे धोरण घेऊन गावासाठी काम करून दाखवण्याचा आणि विरोधकांना त्यांची चूक सिद्ध करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सिंदखेड राजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Leave a Reply