
नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली तपोवनातील झाडांची तोडणी करण्याच्या महापालिका निर्णयाला अभिनेते सयाजी शिंदे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आज सयाजी शिंदे नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांनी तपोवनातील झाडांना चिपको आंदोलन करत या निर्णयाचा निषेध केला. “झाडं जगली तर आपण जगू”, असे सांगत त्यांनी सरकारला झाडे न तोडण्याचा सल्ला दिला. झाडे ही आपले आई-वडील असून, झाडे तोडणे म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांचा अपमान आहे, असे ते म्हणाले.
शासनाने झाडांची चेष्टा करू नये आणि वृक्षतोड थांबवावी अशी सयाजी शिंदे यांची मागणी आहे. गिरीश महाजन यांच्या एका झाडामागे दहा-पंधरा झाडे लावण्याच्या आश्वासनावरही त्यांनी अविश्वास व्यक्त केला, आधी झाडे लावणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. झाडांमुळे मिळणारा ऑक्सिजन आणि अन्न यांचा संदर्भ देत, प्रत्येक मनुष्याचे झाडे वाचवणे हे कर्तव्य असल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले.
Leave a Reply