
Sanjay Raut Big Statement: उद्धव सेनेची मुलुख मैदान तोफ संजय राऊत आजारपणातून बाहेर येताच त्यांनी भाजप, शिंदे सेना आणि मित्रपक्ष काँग्रेसला धो धो धुतले. पहिल्याच पत्रकार परिषदेतून त्यांनी राजकारणाची आगामी दिशा आणि समीकरणांची चुणूक दाखवली. राजकारण नेहमी बिटवीन द लाईन्स वाचवं असा एक संकेत आहे. राऊत हेत हाडाचे पत्रकार आणि राजकारणातील धुरंधर मानले जातात. राजकारणातील दोन विरुद्ध ध्रुव एकत्र आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहेच की. मग त्याच आधारे त्यांनी मित्रपक्षासह विरोधकांनाही खणखणीत इशारा दिला आहे. कोणीही गृहित धरु नये यासाठी त्यांनी आज दिलेला वैधानिक इशारा हलक्यात घेता येणार नाही, हे मात्र खरं.
स्वतंत्र विदर्भावरून चौफेर हल्ला
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पुन्हा स्वतंत्र विदर्भाचं अस्त्र पाजळलं आहे. यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत हे अस्त्र हमखास उपयोगी पडतं होतं. आता त्याची मात्रा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लागू पडते का? याची भाजपकडून चाचपणी सुरू आहे. एकीकडे मुंबईवर गंडातर आणल्या जात असल्याचा उद्धव सेनेचा आरोप आहे. तर राज ठाकरे सुद्धा हाच मुद्दा मांडत आहेत. महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा उद्धव आणि राज ठाकरे यांचा आरोप आहे.
हा मुद्दा तापत असतानाच स्वतंत्र विदर्भाचा पत्ता भाजपने हळूच पिसून बाहेर काढला आहे. हा पत्ता हाती येताच काँग्रेसच्या विदर्भातील नेत्यांनी सुद्धा डाव टाकला आहे. काँग्रेसने विदर्भाच्या मुद्दावरून थेट पत्ताच ओपन केला आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा हुकुमी एक्का कुणाला फायदा मिळवून देईल हे येणाऱ्या निवडणुकीत समोर येईलच. पण त्याच दरम्यान संजय राऊतांनी मित्रपक्षांसह विरोधकांना दिलेल्या गर्भित इशाऱ्यातून नवीन ‘राज’कीय समीकरणही मांडली जात असल्याचे समोर आले आहे.
उद्धव -राज एकत्र आलेयत, हे लक्षात ठेवा
आजच्या पत्रकार परिषदेत स्वतंत्र विदर्भावरून संजय राऊतांनी फ्रंटफुटवर येऊन बॅटिंग केली. त्यांनी भाजप, शिंदे सेनेला फटकारले. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसला यॉर्कर टाकला आहे. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा कुणाचा इरादा असेल तर त्यांनी लक्ष्यात घ्यावं की महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत हे सांगायला संजय राऊत विसरले नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भूमिकेवर एकत्र आहेत. त्याच्यामुळे कोणी हे स्वप्न पाहात असेल तर त्याचं स्वप्न भंग होईल असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
महाविकास आघाडीला भगदाड?
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घ्यावं अशी उद्धव सेनेची आग्रही भूमिका आहे. पण काँग्रेसच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केला आणि काँग्रेस या निवडणुका स्वतंत्र लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. विश्वासात न घेता काँग्रेसने हे धोरण जाहीर केल्यानं उद्धव सेनाच नाही तर राष्ट्रवादीची ही नाराजी असल्याचे समजते. महाविकास आघाडी म्हणून मुंबई महापालिका निवडणूक लढवली तर भाजप आणि शिंदे सेनेला रोखता येईल हा मुख्य हेतू त्यामागे आहे. पण काँग्रेसकडून अजून सकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाही. त्यातच वेगळ्या विदर्भावरून वातावरण तापलेले आहे. त्यामुळेच राऊतांनी उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत असा गर्भित इशारा तर दिला नसावा ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Leave a Reply