
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. प्रत्येक सिझनच्या सुरुवातील बिग बॉसमध्ये कोणते कलाकार दिसणार याची चर्चा सुरु असते. नुकताच बिग बॉस 19चा फिनाले पार पडला. आता सर्वांना बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनची उत्सुकता लागली आहे.
बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन चांगलाच गाजला होता. या सिझनचे अभिनेता रितेश देशमुखने सूत्रसंचालन केले होते. तसेच शोमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत पासून ते इन्फ्लूएंसर सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर दिसले होते. आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये कोणते कलाकार दिसणार याची चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली होती. चाहते देखील आनंदी होते. आता प्राजक्ता माळीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्राजक्ता माळीने नुकताच इन्स्टाग्रामवरील Ask Me Anythingh या फिचरच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्यावेळी एका चाहत्याने प्राजक्ताला बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर प्राजक्ताने उत्तर देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
प्राजक्ताने चाहत्याच्या बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या प्रश्नाला उत्तर देत म्हटले की, कधीच नाही. त्यामुळे प्राजक्ता कधीही बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये आता कोणते कलाकार सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Leave a Reply