
MLA Pradnya Satav Entry in BJP: मराठवाड्यात भाजपने काँग्रेसला पुन्हा अस्मान दाखवले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसमध्ये अजून एक मोठं खिंडार पाडण्यात भाजपला यश आले आहे. हिंगोली हा काँग्रेस आणि सातव कुटुंबियांचा अभेद्य किल्ला होता. त्यालाच भाजपने सुरुंग लावला. माजी खासदार आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोविड काळात सातव यांना काळाने हिरावले. त्यानंतर काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व दिले होते. भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानल्या जात आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा झटका ठरणार आहे.
मुंबईत मोठ्या हालचाली
मोजक्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त यापूर्वी समोर येत होते. काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आजच सकाळी मुंबईत पोहचले. या कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने हा एक मोठा धक्का काँग्रेसला दिल्याचे मानले जात आहे. उद्या भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आमदार प्रज्ञा सातव यांचा पक्ष प्रवेश 11 वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक निवडणुकीदरम्यान भाजपकडून विविध पक्षांना धक्के देण्यात येत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी
डॉक्टर प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे 2014 ते 2019 या काळात हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे म्हणून त्यांची ओळख होती. पण 2021 मध्ये कोविड काळात त्यांचा मृत्यू अनेकांना धक्का देणारा ठरला. त्यांच्यानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना राजकारणात आणले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. सध्या त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणूनही काम पाहत आहेत. 2021 मधील पोट निवडणुकीत त्या विधानपरिषदेवर निवडून आल्या होत्या. गेल्यावर्षी त्यांना काँग्रेसने पुन्हा विधान परिषदेवर पाठवले होते. आता 2030 पर्यंत त्या विधान परिषदेच्या आमदार म्हणून कार्यरत असतील.
सातव हे काँग्रेसचे एकनिष्ठ घराणे मानले जाते. मोदी लाटेतही राजीव सातव हे दोनदा खासदार म्हणून निवडून गेले होते. राजीव सातव यांचे दिल्लीतील काँग्रेसमध्ये मोठे वजन होते. सताव यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा असा राजकारणातील प्रवास केला. त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले होते.
Leave a Reply