
प्रत्येकाच्या जन्मतारखेचं अंकशास्त्रात एक वेगळं महत्त्व असतं. अंकशास्त्रानुसार तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्याशी संबंधित भविष्यातील घटनाही समजण्यास मदत होते. 0 ते 9 दरम्यान हे मूलांक असतात. कोणत्या मूलांकाचं कोणत्या मूलाकांशी चांगलं जमतं, कोणाचे वाद होतात.. याविषयीही अंकशास्त्रात समजण्यास मदत होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनीचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी झाला. त्यानुसार त्यांचा मूलांक 7 आहे. तर हेमा मालिनी यांचा सावत्र मुलगा आणि अभिनेता सनी देओलचा जन्म 19 ऑक्टोबर 1957 रोजी झाला. या गणनेनुसार, सनीचा मूलांक 1 आहे.
मूलांक 1 असलेल्या लोकांना प्रचंड स्वाभिमान असतो. ते स्वत:च्या इच्छेचे स्वामी असतात. इतरांनी कितीही काही सल्ला दिला तरी ते आपल्या मनानुसारच वागतात. त्यांना जे आवडतं, तेच ते करतात. त्यांना रागही लवकर येतो. तर सातव्या मूलाकांचा स्वामी केतू ग्रह आहे. त्यामुळे ते अध्यात्मिक आणि अंतर्मुखी असतात. 7 मूलांक असलेले बरेच लोक रहस्यमयी आयुष्य जगतात. त्यांच्या मनात काय चाललंय हे समजणं इतरांसाठी कठीण असतं. ते नेहमीच त्यांच्या निर्णयांबद्दल संभ्रमात, गोंधळलेले असतात. त्यामुळे जरी त्यांचं मत अचानक बदललं तरी ते आश्चर्यकारक नसतं. त्यांना धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग घेऊन आनंद मिळतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ते भावनिक असतात. ते इतरांना लगेच समजून घेतात, परंतु स्वत:चं मत नोंदवताना ते वेळ घेतात.
मूलांक 1 असलेले लोक सूर्याच्या प्रभावामुळे कृतीशील आणि प्रबळ इच्छाशक्ती असलेले असतात. त्यांच्यात नेतृत्वगुण असतं. तर 7 मूलांक असलेले लोक सहसा त्यांचे विचार कोणाशीही शेअर करत नाहीत. त्यामुळे इतरांना त्यांचा स्वभाव समजणं कठीण होतं.
धर्मेंद्र हे प्रकाश कौर यांच्याशी विवाहित असताना हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या दोन्ही मुलांना म्हणजेच सनी आणि बॉबी देओलला वडिलांचं हे दुसरं लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे हेमा मालिनी आणि त्यांच्यात कायम दुरावा राहिला. आता धर्मेंद्र यांच्या निधनानंतरही सनी देओल आणि हेमा मालिनी यांच्यातील दुरावा स्पष्टपणे दिसला. सनी आणि हेमा यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी दोन वेगवेगळ्या शोकसभा आयोजित केल्या होत्या. सनी देओलने आयोजित केलेल्या शोकसभेला हेमा मालिनी उपस्थित नव्हत्या. हेच हेमा यांनी आयोजित केलेल्या शोकसभेतही पहायला मिळालं. तिथे सनी किंवा बॉबी देओल उपस्थित नव्हते.
Disclaimer: हा लेख अंकशास्त्र आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. TV9 Marathi त्याची पुष्टी करत नाही.
Leave a Reply