
गेल्या काही काळापासून फसवणूकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. अशातच आता मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिराखाली सापडलेला खजिना स्वस्तात विकण्याच्या बहाण्याने चौघांनी 25 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. मालाडमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीसांनी आरोपींकडून 15 लाखांची रोकड आणि बनावट सोने जप्त केले आहे. अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचेही समोर आले आहे. त्यांच्यावर गुजरातमध्येही गुन्हे दाखल आहेत. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
खजिन्याच्या नावाखाली 25 लाखांना लुबाडलं
मंदिराखाली सापडलेला खजिना विकण्याच्या नावाखाली 4 जणांनी बनावट सोने देत 25 लाखांची रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. दीड कोटींचा खजिना असून तो 25 लाखांना विकण्यात आला होता. या प्रकरणी बाबूलाल वाघरी, मंगलाराम वाघरी, भंवरलाल वाघरी आणि केसाराम वाघरी या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या चौघांनी मुंबईतील मालाड पश्चिम येथील व्यापारी दिनेश मेहता यांना बनावट सोनं देत लुबाडलं होतं. मात्र आता पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
खरे सोनं दाखवून विश्वास जिंकला
या प्रकरणी माहिती देताना दिनेश मेहता यांनी सांगितले की, 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात बाबूलाल वाघरी या आरोपीने त्यांच्यासोबत ओळख वाढवली. यावेळी त्याने नाशिकमधील एका मंदिराच्या मागे उत्खनन सुरू असताना 900 ग्रॅम सोने सापडले असल्याचे सांगितले. तसेच हे सोने विकायचे असून खरेदीदार हवा असल्याचे तो म्हणाला. त्यानंतर आरोपीने त्यांना काही सोन्याचे मणी दाखवले आणि ते मेहता यांच्याकडे तपासणीसाठी दिले. मेहता यांनी या मण्यांची तपासणी केल्यानंतर ते खरे सोने असल्याचे समोर आले.
सोन्याच्या जागी दिले पितळ
सोने खरे असल्याचे समजताच मेहता यांनी ते खरेदी करण्यासाठी रस दाखवला. यावेळी आरोपींना त्यांच्याकडून 25 लाख रुपये घेतला आणि त्यांना 900 ग्रॅम सोने सोपवले. यानंतर मेहता यांनी एका सोनाराकडे जात या सोन्याची तपासणी केली, त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला. हे सोने नसून पितळ असल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे मेहता यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांना पोलिस स्टेशन गाठले आणि फसवणुकीची तक्रार दिली. यानंतर पोलीसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
Leave a Reply