
राज्य सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झालं आहे. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी हे अटक वॉरंट निघालं आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्ष कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा झाली आहे. कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता अर्जदार आशुतोष राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की, त्यानुसार मंत्री कोकाटे यांच्याविरुद्ध अटकेचे आदेश निघाले आहेत. त्वरित पोलिसांसमोर शरण जावं किंवा पोलिसांनी अटक करावी असे न्यायालयीन आदेश निघाले आहेत.कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे” असं अर्जदार आशुतोष राठोड म्हणाले.
“माणिकराव कोकाटे हे कॅबिनेट मंत्री आहेत, न्यायालयाने विचार करावा असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. त्यावर न्यायालयाने स्पष्टपणे निरीक्षण नोंदवलं की, कायद्यापुढे सगळे समान आहेत. एक चांगला संदेश समाजाला दिलेला आहे. या सर्व प्रकरणात दिघोळे साहेबांच्या कन्या अंजली दिघोळे यांनी लढा दिला” असं आशुतोष राठोड म्हणाले.
तब्येतीची सबब कोर्टाने का अमान्य केली?
“कोकाटे हे रुग्णालयात आहेत, असं कोर्टात सांगण्यात आलं. पण त्याचे कागदोपत्री कोणतेही पुरावे दिले नाहीत. कॅबिनेटच्या बैठका झाल्या, नगरपालिका निवडणुकीच्या रॅल्या झाल्या. तिथे माणिकराव कोकाटे हजर होते. त्यामुळे तब्येत खराब असण्याची सबब कोर्टाने अमान्य केली” असं आशुतोष राठोड म्हणाले.
म्हणजे त्वरित आमदारकी रद्द होणार
“माणिकराव कोकाटे यांना पोलिसांनी आता अटक करुन तात्काळ त्यांची रवानगी कारागृहात करावी, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, दोन वर्षांची शिक्षा झाली म्हणजे त्वरित आमदारकी रद्द होणार. त्यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देणं क्रमप्राप्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यायप्रिय आहेत. मी त्यांना विनंती करीन की, कमीत कमी आता तरी राजीनामा घ्यावा आणि कायद्याचं राज्य आहे, याची प्रचिती द्यावी” असं आशुतोष राठोड म्हणाले.
शासनाची फसवणूक केल्याचं सिद्ध झालं
“सध्या माझी सत्यमेव जयते अशीच भावना आहे. माणिकराव कोकाटेंच्या विरोधीत ही तत्वांची लढाई होती. न्याय जिवंत आहे. कायद्यानुसार न्याय मिळतो. कोर्टाने आदेश दिलाय त्वरित अटक करण्यात यावी” असं आशुतोष राठोड म्हणाले. “मुख्यमंत्री कोट्यातली सदनिका आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचं दाखवून घेतली. शासनाची फसवणूक केल्याचं सिद्ध झालेलं आहे. अटक, आमदारकी रद्द होणं या औपचारिक बाबी राहिल्या आहेत” असं आशुतोष म्हणाले.
Leave a Reply