
नुकताच २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नगरपालिकांमध्येही महायुतीने २०० चा आकडा पार करत दणदणीत विजय मिळवला आहे. ही केवळ सुरुवात असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्येही महायुतीची विजयी घोडदौड कायम राहील, असे संकेत मिळत आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने ११८ नगराध्यक्ष निवडून आणले, ज्यामुळे अनेक नगरपरिषदांमध्ये त्यांची सत्ता स्थापन झाली आहे. तसेच, भाजपने २०१७ च्या तुलनेत मोठी आघाडी घेत ३३२५ नगरसेवक निवडून आणले आहेत, जे एकूण नगरसेवकांच्या ४८ टक्के आहेत.
गेल्या २५-३० वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात इतका मोठा विजय कोणत्याही पक्षाला मिळालेला नाही, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेप्रमाणेच नगरपरिषदांच्या निवडणुकीतही जोरदार प्रचार केला, ज्याचा फायदा भाजपला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीमधील इतर घटक पक्षांचा विचार केल्यास, शिंदेच्या शिवसेनेने ५९ नगराध्यक्ष निवडून आणत दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ३७ नगरपरिषदांमध्ये सत्ता मिळवण्यात यश आले आहे. एकत्रितपणे, महायुती २१४ जागा जिंकून २०० चा आकडा पार करण्यात यशस्वी ठरली आहे.
Leave a Reply