
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. उद्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ६० नगरपरिषदा आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पैठण, बीड, आळंदी येथे सभा होत आहे, तर एकनाथ शिंदे पैठण आणि कन्नड येथे प्रचार करत आहेत. अजित पवार यांची म्हसवड येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे.
निवडणुकीतील प्रलोभनं देणाऱ्या वक्तव्यांवरही निवडणूक आयोग गंभीर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. राज्यातील प्रचाराच्या रणधुमाळीत प्रलोभनं देणाऱ्या २० नेत्यांच्या वक्तव्यांची आयोगाने दखल घेतली आहे. यात एकनाथ शिंदे, अजित पवार, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, जयकुमार गोरे आणि चित्रा वाघ यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. संबंधित नेत्यांनी जिथे वक्तव्ये केली आहेत, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगाने तात्काळ अहवाल मागवला आहे. निवडणूक आयोगाची ही सक्रियता निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेचे दर्शन घडवते.
Leave a Reply