
महाराष्ट्रातील एकूण 288 नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज (21 डिसेंबर) जाहीर होणार आहेत. पहिल्यांदाच महायुतीतील भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात उतरले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतही अशीच स्थिती दिसून आली.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचे निकाल महापालिका निवडणुकांसाठी रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहेत. तसेच राज्यातील नंबर वन पक्ष कोणता, याचाही फैसला या निकालातून होईल.
या 288 नगरपालिकांसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला 265 ठिकाणी, तर दुसऱ्या टप्प्यात 20 डिसेंबरला उर्वरित 23 ठिकाणी मतदान पार पडले. त्यानंतर आज सकाळपासून ईव्हीएम मशिन्स उघडून मतमोजणी सुरू होईल.
दरम्यान, काही ठिकाणी निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या. महायुतीतील तीनही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने खरी स्पर्धा भाजप आणि शिंदे शिवसेनेत दिसली. त्यामुळे कोण बाजी मारणार, याची प्रचंड उत्सुकता आहे! राज्यातील छोट्या शहरांमधील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे, याचा स्पष्ट चित्र आज समोर येईल. त्यामुळेच या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण निकालाच्या दिवसभरातील घडामोडी तुम्हाला टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह बघता येणार आहेत.
Leave a Reply