
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून दोन्ही संस्था बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप हाके यांनी केला. यासोबत मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरही लक्ष्मण हाके यांनी उपहासात्मक टीका केली. जरांगे यांना “प्रगाढ पंडित” आणि “ज्ञानवान माणूस” संबोधत त्यांनी जरांगे यांची पाकिस्तानमध्ये, विशेषतः इम्रान खान यांच्या परिस्थितीमुळे, “खूप आवश्यकता” असल्याचे म्हटले. आरक्षणाचा बट्ट्याबोळ करून समाजात दुही निर्माण केल्यानंतर जरांगे हे समाजासाठी फायद्याचे आहेत की तोट्याचे, यावर मराठा समाजातील विचारवंत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विश्लेषण करावे, असे आवाहन त्यांनी केले. जरांगे यांनी व्यवसायात जाऊन काय करणार, असा सवाल करत, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर युनोसारख्या संस्थेत नेमणूक देण्याची विनंती महाराष्ट्र शासनाला करू, असा टोलाही त्यांनी लगावला.
Leave a Reply