
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं बोललं जातं, दरम्यान महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं, तर लाभार्थी महिलांच्या सन्मान निधीमध्ये वाढ करून 2100 रुपये करू असं अश्वासनही त्यावेळी महायुतीच्या अनेक नेत्यांकडून देण्यात आलं होतं. मात्र अजूनही 2100 रुपयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या योजनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आज नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे, महायुतीचे 288 पैकी तब्बल 214 नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष आहे. शिवसेना शिंदे गटाचे 57 उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचं अभिनंदन केलं आहे.
शिवसेनेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढे नगराध्यक्ष निवडून आले नव्हते. कार्यकर्त्यांचं आणि लाडक्या बहिणींचं अभिनंदन, लाडकी बहीण, लेक लाडकी लखपती, मुलींना उच्च शिक्षण मोफत ,आरोग्याबाबत अनेक योजना राबवल्या, याचा मला आनंद आणि समाधान आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत जी महाविकास आघाडीने स्थगिती दिली होती, ते सगळे अडथळे दूर केले आणि महाराष्ट्राला पुढे नेलं. माझी आवडती योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. अनेकांनी विरोध केला मात्र विरोध मोडून काढत योजना सुरू ठेवली.कोणताही माई का लाल ही योजना बंद करू शकत नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार म्हणजे देणार, योग्य वेळी आम्ही सन्मान निधीत वाढ करणार, अशी घोषणा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
Leave a Reply