• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ISPL Season 3 Auction: मुंबईत 9 डिसेंबरला 408 खेळाडूंची बोली लागणार

December 1, 2025 by admin Leave a Comment


संदीप जाधव, मुंबई, 1 डिसेंबर 2025: भारतातील आघाडीची टेनिस-बॉल टी10 स्पर्धा असलेल्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या (ISPL) आणखी एका ब्लॉकबस्टर सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळेच आयएसपीएलने सीझन 3 साठी 9 डिसेंबर रोजी मुंबईत खेळाडूंचा लिलाव होणार असल्याचे जाहीर केले आहे. लीगच्या मोठ्या, चांगल्या आणि आव्हानात्मक सीझनसाठी आठ फ्रँचायझी त्यांचे संघ उभे करण्याच्या तयारीत आहेत. या सीझनमध्ये 101 शहरांमधील 408 खेळाडूंसाठी बोली लावली जाईल. 9 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 दरम्यान रंगणाऱ्या सीझन 3चे यजमानपद सुरतमधील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियम भूषवेल.

कठीण चाचण्यांनंतर एकूण 400 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये 19 वर्षांखालील 30 खेळाडूंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आठ संघांपैकी प्रत्येक संघ लिलावासाठी विद्यमान सीझन 3 नोंदणीकृत पूलमधून एक खेळाडू निवडेल. ज्यामुळे खेळाडूंची एकूण संख्या 408 एवढी होईल.

खेळाडूंना सहा श्रेणींमध्ये विभागले जाईल: अंडर-19, पश्चिम विभाग, पूर्व विभाग, मध्य विभाग, दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग. लिलावात प्रत्येक खेळाडू ₹3 लाखांच्या मूळ किमतीसह सहभागी होईल. या सीझनचा सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे बक्षिसाच्या रकमेत झालेली वाढ. जी ₹1 कोटींवरून ₹1.5 कोटी करण्यात आली आहे. तर संघातील खेळाडूंची संख्या देखील 16 वरून 18 करण्यात आली आहे. बोली लावणाऱ्यांसाठी यावेळी आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य जोडण्यात आले आहे. ते म्हणजे या फ्रँचायझी “गूगली पॉवर” वापरण्यास सक्षम असतील. ही एक अनोखी व्हेटो यंत्रणा आहे जी उच्च-तीव्रतेच्या बोलींमध्ये अचानक ₹1 लाखांची बोली वाढवते. गेल्या हंगामातील सहा संघांकडे प्रत्येकी दोन आरटीएम कार्ड असतील, ज्यामुळे ते त्यांच्या सीझन 2च्या खेळाडूंवरील सर्वोच्च बोलीशी जुळवून घेत लिलावादरम्यान त्यांना पुन्हा मिळवू शकतील.

कोणत्याही खेळाडूसाठी फ्रँचायझी मालक कमाल मर्यादेशिवाय बोली लावू शकतात. तसेच आपल्या राखून ठेवलेल्या खेळाडूंसह प्रत्येक संघाने प्रत्येक झोनमधून किमान दोन खेळाडू निवडणे आवश्यक आहे. संघात किमान दोन अंडर-19 खेळाडूंचा समावेश असणे आवश्यक आहे. प्रत्येक सामन्यात एक अंडर-19 खेळाडू आणि प्रत्येक झोनमधील एक खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग असणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त, सर्व 18 संघ सदस्यांनी सीझन 3 दरम्यान किमान एक सामना खेळला पाहिजे.

  • मूळ किंमत: ₹3 लाख
  • बक्षिसाची किंमत: ₹1 कोटी → ₹1.5 कोटी
  • खेळाडूंच्या संख्येत वाढ: 16 → 18 खेळाडू
  • नवीन यंत्रणा – गुगली पॉवर: लिलावादरम्यान अचानक ₹1 लाखांची बोली
  • 2 RTM कार्ड संघांना त्यांच्या सीझन 2 संघातील खेळाडूंना पुन्हा घेण्याची संधी, नव्याने बोली लावण्याची गरज.

आयएसपीएलची कोअर कमिटी मजबूत आहे. सचिन तेंडुलकर, आशिष शेलार, मीनल अमोल काळे आणि सूरज सामत या सदस्यांचा त्यांच्या समितीत समावेश आहे. जे लीगचा जलद विस्तार, व्याप्ती आणि लोकप्रियतेसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.

आयएसपीएलच्या कोर कमिटीचे सदस्य सचिन तेंडुलकर म्हणाले: “आयएसपीएलचा तिसरा सीझन हा भारतातील तळागाळातील क्रिकेटच्या प्रतिभेसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. दरवर्षी, देशाच्या विविध भागांमधून नवीन चेहरे आणि असामान्य प्रतिभा आपल्याला अनुभवायला मिळते. हा लिलाव म्हणजे खेळाडूंसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. कारण त्यांना कोणाचेही लक्ष वेधून घेण्यासाठी एक योग्य मंच मिळतो. खेळाडू हे आव्हान कसे स्वीकारतात आणि त्यांच्यासमोर असलेल्या संधीचा पुरेपूर फायदा कसा घेतात हे पाहण्यास मी उत्सुक आहे.”

आयएसपीएलच्या कोर कमिटीचे सदस्य आशिष शेलार म्हणाले: “सीझन 3ला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. यात सहभागी होण्यासाठी भारतातील वेगवेगळ्या 101 शहरांमधून खेळाडू आले आहेत. यंदा येथे उपलब्ध असलेले प्रतिभेचे वैविध्य खरोखरच उत्तम आहे. देशभरातून एका वेगळ्याच ध्येयाने आणि महत्त्वाकांक्षेने खेळाडू यात सहभागी होण्यासाठी येत आहेत. आयएसपीएलने आपल्या देशात किती महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे, आणि त्याने किती विश्वास मिळवला आहे हे यावरून दिसून येते. मला विश्वास आहे की, स्पर्धात्मकता आणि सर्वसमावेशकतेमध्ये सीझन 3 नवीन बेंचमार्क स्थापित करेल.”

आयएसपीएलच्या कोर कमिटी सदस्या मीनल अमोल काळे म्हणाल्या: “या लिलावाची सर्वांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. विशेषत: चाचण्यांदरम्यान समोर आलेली रोमांचक प्रतिभा. लीग जसजशी विस्तारत जाते तसतसे हे खेळाडू घराघरात जाऊन पोहोचतात आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याची संधी देखील त्यांना मिळते. बोलीमधील संघर्ष, रोमांचक संघ संयोजन आणि लिलाव झाल्यावर चाहत्यांना अनेक गोष्टींची उत्सुकता असते. या मंचावरून कोणते नवीन स्टार उदयास येतात आणि देशाची प्रतिभा कशाप्रकारे पुढे येते, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”

आयएसपीएलच्या कोर कमिटीचे सदस्य आणि लीग कमिशनर सूरज सामत म्हणाले: “लीगच्या वाढत्या दर्जानुसार सर्वोच्च व्यावसायिक मानकांचे प्रतिबिंबित करण्यासाठी यंदाचा लिलाव डिझाइन करण्यात आला आहे. नियोजनबद्ध बोली ऑर्डरपासून ते ‘गूगली पॉवर’ सुरू करण्यापर्यंत, पारदर्शकता, निष्पक्षता आणि धोरणात्मक खोली सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घटक तयार करण्यात आला आहे. या हंगामासाठी किती गांभीर्याने आणि उत्साहाने फ्रँचायझी तयारी करत आहेत, ते चाचण्यांदरम्यान त्यांनी दाखवलेल्या उत्साहातून समोर येते. जागतिक स्तरावर सर्वोत्तम पद्धतींशी जुळणारा लिलाव अनुभवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान, विश्लेषण आणि ऑपरेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. बक्षिसाची वाढलेली रक्कम आणि मोठ्या संघांसह पूर्वीपेक्षा अधिक लवचिकता आहे. उपलब्ध प्रतिभेच्या गुणवत्तेमुळे यंदा सर्व फ्रँचायझींमध्ये अपेक्षा वाढल्या आहेत. कॉंटे की टक्कर आणि क्रिकेटच्या सीमा ओलांडून प्रतिभा समोर आणणाऱ्या स्पर्धेची मी वाट पाहतो आहे.”

देशभराचे लक्ष वेधून घेणाऱ्या या सीझनमध्ये आयएसपीएलने अजूनच उत्सुकता आणली आहे. या सीझनमधील सर्वात प्रतिभावान खेळाडूला (एमव्हीपी) एक नवीन पोर्श 911 दिली जाईल. भारतातील फ्रँचायझी क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये याचा समावेश होतो.

आयएसपीएलची वाढती प्रतिष्ठा त्याच्या विस्तारातूनही समोर येते. या हंगामात दिल्ली सुपरहीरो (सलमान खान) आणि अहमदाबाद लायन्स (अजय देवगण) हे नवीन संघ सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत गतविजेती माझी मुंबई (अमिताभ बच्चन), टायगर्स ऑफ कोलकाता (सैफ अली खान आणि करीना कपूर खान), श्रीनगर के वीर (अक्षय कुमार), चेन्नई सिंगम्स (सूर्या), बेंगळुरू स्ट्रायकर्स (हृतिक रोशन) आणि फाल्कन रायझर्स हैदराबाद (राम चरण) यांचा समावेश असेल.

प्रत्येक फ्रँचायझीला एका खेळाडूला कायम ठेवण्याची परवानगी देणारी नवीन रिटेन्शन पॉलिसी लागू झाल्यामुळे, सीझन 3चा लिलाव आणखी धोरणात्मक आणि तीव्र स्पर्धात्मक होण्याची अपेक्षा आहे.

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) सीझन 3 लिलावाचा कार्यक्रम थेट पाहा : 9 डिसेंबर 2025, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओहॉटस्टारवर लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai BMC Election: जे हिंदुत्वाचे नाही झाले.. ते मराठी माणसाचे… ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या ‘त्या’ बॅनरची तुफान चर्चा
  • IPL Auction 2026 Live: अबुधाबीत मिनी ऑक्शनचा थरार, 369 पैकी 77 खेळाडूच ठरणार सोल्ड
  • मिस्ट्री मॅनसोबत दिसली प्रसिद्ध अभिनेत्री; पापाराझींना पाहताच झटकला त्याचा हात, लपवला चेहरा
  • Gyan Bharatam Mission: पतंजली विद्यापीठाला क्लस्टर सेंटर म्हणून मान्यता; बाबा रामदेवांकडून ज्ञान भारतम मिशनचं महत्त्व स्पष्ट
  • सकाळी की रात्री… दारू पिण्याची खरी मजा कधी, ‘तो’ क्षण केव्हा ठरतो खास?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in