
आयपीएल मिनी लिलावापूर्वी आरसीबीच्या पर्समध्ये 16.65 कोटी रुपये होते. गतविजेत्या आरसीबी संघात कसा बदल करते याकडे लक्ष लागून होते. त्यामुळे कोणत्या खेळाडूंसाठी बोली लावणार याची उत्सुकता होती.आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे खरेदीसाठी 8 जागा शिल्लक होत्या. त्यांनी रिटेन्शनद्वारे संघात त्यांच्या 17 खेळाडूंना कायम ठेवले आहे. मिनी लिलावात 16.40 कोटी रुपयांच्या खर्च करून गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 8 खेळाडू खरेदी केले आहेत. यासह आपला संघ आणखी मजबूत केला आहे. आरसीबीने 6 भारतीय खेळाडू आणि दोन विदेशी खेळाडूंना संघात समाविष्ट केले आहे. आरसीबीने सर्वात मोठी बोली वेंकटेश अय्यरवर लावली. केकेआरकडून खेळणारा वेंकटेश अय्यर याला आरसीबीने 7 कोटी रुपयांना खरेदी केले.मध्य प्रदेशचा अष्टपैलू मंगेश यादव याला आरसीबीने 5.20 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याचप्रमाणे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफीला 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर खरेदी केले.
आरसीबीने खरेदी केलेले 8 खेळाडू
- वेंकटेश अय्यर – 7 कोटी रुपये
- मंगेश यादव – 5.20 कोटी रुपये
- जेकब डफी – 2 कोटी रुपये
- जॉर्डन कॉक्स – 75 लाख रुपये
- सात्विक देसवाल – 30 लाख रुपये
- विकी ओस्तवाल – 30 लाख रुपये
- कनिष्क चौहान – 30 लाख रुपये
- विहान मल्होत्रा - 30 लाख रुपये
या फ्रँचायझीने मेगा लिलावात वेंकटेश अय्यरसाठी बोली लावली होती. पण कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी मोठी बोली लावली आणि संघात ठेवलं होतं. पण त्याला रिलीज केल्यानंतर आरसीबीने पुन्हा फिल्डिंग लावली आणि यश मिळवलं. आरसीबीच्या पर्समध्ये आता 25 लाख रूपये शिल्लक आहेत. स्वस्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, टिम सेफर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, मनोज भागे, लुंगी एनगिडी, ब्लेसिंग मुजारबानी आणि मोहित राठी या खेळाडूंना रिलीज केलं होतं. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2026 साठी ट्रेडिंगद्वारे कोणत्याही खेळाडूचा संघात समावेश केलेला नाही.
आरसीबीने मागच्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं होतं. 17 पर्वानंतर 18व्या पर्वात आरसीबीच्या पदरी यश पडलं होतं. पण यावेळी जेतेपद राखण्याचं आव्हान आहे. सलग दोन वेळा जेतेपद मिळणार का? की पदरी निराशा पडणार हे आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
Leave a Reply