
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात अहमदाबादमधील पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 30 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 201 धावाच करता आल्या. भारताने यासह हा सामना आणि मालिका जिंकली. भारताचा हा मालिकेतील तिसरा विजय ठरला. भारताने यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 5 सामन्यांची मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती हे तिघे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
तिलक वर्मा आणि हार्दिक पंडया या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं करत भारताला 231 धावांपर्यंत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. तर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामी जोडीनेही योगदान दिलं. त्यानंतर वरुण चक्रवर्ती याने फिरकीने कमाल केली. वरुणने टीम इंडियासाठी सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. वरुणने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना झटपट आऊट करत विजयी धावांपर्यंत पोहचण्यापासून यशस्वीरित्या रोखलं.
Leave a Reply