
मागच्या अनेक दिवसांपासून लाखो भारतीय क्रिकेट फॅन्स आणि एक्सपर्ट्स एक मागणी करत होते. भारत-दक्षिण आफ्रिकेतील अखेरच्या टी 20 सामन्यादरम्यान ती मागणी पूर्ण झाली. महत्वाचं म्हणजे ही मागणी चुकीची नव्हती हे दिसून आलं. टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल मागच्या अनेक दिवसांपासून सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे गिलच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्याची मागणी सुरु होती. अखेर गिलच्या दुखापतीमुळे हे शक्य झालं. सॅमसनने त्याच्या एकाच इनिंगमध्ये दाखवून दिलं की, त्याला ओपनिंगवरुन हटवण्याचा निर्णय चुकीचा होता. टी 20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्मासोबतच ओपनर म्हणून तो कसा परफेक्ट ठरु शकतो, हे संजूने दाखवून दिलं.
अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीजच्या शेवटच्या सामन्यात संजू सॅमसनला टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली. सॅमसनला सीरीजच्या पहिल्या तीन सामन्यात संधी मिळाली नव्हती. चौथ्या सामन्यात शुबमन गिलच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे सॅमसनला संधी मिळणं निश्चित होतं. दाट धुक्यामुळे चौथा सामना रद्द झाला होता. अहमदाबादमध्ये शेवटची संधी होती. कारण गिल सीरीजचे उर्वरित सामने खेळू शकणार नव्हता. सॅमसनने सु्द्धा मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला.
अर्धशतक मात्र झळकवता आलं नाही
अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला आलेल्या सॅमसनने दुसऱ्या ओव्हरमध्ये सिक्स मारुन खातं उघडलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी फोडून काढली. सॅमसन अभिषेक शर्मासोबत मिळून टीम इंडियाला पावरप्लेमध्येच 60 धावांच्या पुढे घेऊन गेला. अभिषेक सहाव्या ओव्हरमध्ये आऊट झाला. पण सॅमसनची त्यानंतरही पावर हिटिंग सुरुच होती. तो आरामात चौकार वसूल करत होता. चांगली सुरुवात करुन संजूला अर्धशतक मात्र झळकवता आलं नाही. तो 10 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला.
गिलच्या तीन सामन्यात किती धावा?
शुबमन गिलला सीरीजच्या तीन सामन्यात जे शक्य झालं नाही, ते संजूने एका सामन्यातच करुन दाखवलं. सॅमसन सीरीजमध्ये फक्त एक सामना खेळला आणि 22 चेंडूत गिलपेक्षा जास्त धावा केल्या. संजूने 22 चेंडूत 37 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 2 षटकार होते. गिलने 3 मॅचमध्ये 28 चेंडूंचा सामना केला. त्याला फक्त 32 धावाच करता आल्या. त्याने एकूण 6 चौकार मारले.
भारताने जिंकला सामना
पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 30 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 232 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 201 धावाच करता आल्या.
Leave a Reply