
टीम इंडियाला कसोटी मालिकेत पराभूत करुन भारत दौऱ्याची दणक्यात सुरुवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेवर टी 20I सीरिजमध्ये टांगती तलवार आहे. दक्षिण आफ्रिका या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. उभयसंघातील चौथा सामना हा बुधवारी 17 डिसेंबरला लखनौतील एकाना स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाला या सामन्यासह मालिका जिंकण्याची दुहेरी संधी आहे. मात्र पाहुण्या दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे या सामन्यात चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने या विजयासह कमबॅक केलं आणि मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. त्यामुळे आता टीम इंडियाला चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेला मालिका गमवायची नसेल तर चौथ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. अशात दक्षिण आफ्रिका या आर या पार अशा स्थितीत टीम इंडियासमोर कशी कामगिरी करते याकडे लक्ष असणार आहे.
टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने चौथ्या सामन्यासाठी जोरदार सराव केला आहे. तसेच टीम इंडियाचा हा आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी सातवा सामना आहे. त्यामुळे टीम इंडियासाठीही हा सामना महत्त्वाचा आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेवर जास्त दडपण आहे. त्यात भारताच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत पुनरागमन केलं. त्यामुळे भारताचा विश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा भारतासमोर कस लागणार हे निश्चित आहे.
Leave a Reply