
भारतीय क्रिकेट संघाने 2025 या वर्षाचा शेवट अप्रतिम केला. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 3-1 ने धुव्वा उडवला. त्यानंतर आता टीम इंडिया नववर्षात आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20i अशा 2 मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड या दोन्ही मालिकांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 वनडे आणि 5 टी 20i सामने होणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतासाठी टी 20i मालिका फार महत्त्वाची असणार आहे. तर एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली ही स्टार जोडी खेळणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या दोघांच्या कमबॅकची प्रतिक्षा लागून आहे. कॅप्टन शुबमन गिल याने न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी तयारीला सुरुवात केली आहे. तर मुंबईकर श्रेयस अय्यर याचंही कमबॅक होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
भारतीय संघाची घोषणा केव्हा?
न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात 11 जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेने होणार आहे. या मालिकेसाठी मोजून 2 आठवडे बाकी आहेत. अशात या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा लागून आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाची वनडे सीरिजसाठी 3 किंवा 4 जानेवारीला घोषणा होऊ शकते.
शुबमन-श्रेयसच्या कमबॅकची प्रतिक्षा
शुबमन गिल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर आता शुबमन कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. शुबमनचं कमबॅक झाल्यास तो नेतृत्व करणार हे नक्की आहे. मात्र श्रेयसचं कमबॅक होणार की नाही? याबाबत निश्चितता नाही. श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली होती.
भारताची कामगिरी
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवलीय मालिकेत सरस कामगिरी केली होती. या मालिकेत रोहित आणि विराट या अनुभवी जोडीने कमाल केली होती. विराटने 3 पैकी 2 सामन्यांमध्ये 2 शतकं केली होती. तर 1 अर्धशतक ठोकलं होतं.
हिटमॅनचा तडाखा
विराटप्रमाणे रोहितनेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कडक कामगिरी केली होती. तर फिरकीपटू कुलदीप यादव याने 3 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता चाहत्यांना टीम इंडियाकडून न्यूझीलंड विरुद्धही कडक कामगिरीची आशा असणार आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ : केएल राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह आणि ध्रुव जुरेल.
Leave a Reply