
सध्या थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत ‘धुरंधर’ या चित्रपटाचीच चर्चा आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज असली तरी प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांसह इतरही कलाकारांच्या यात भूमिका आहेत. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी इतक्या मोठ्या प्रमाणावर होतेय, की त्यामुळे आपोआप प्रेक्षक ‘धुरंधर’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. सोशल मीडियावर इतके पोस्ट, रील्स, व्हिडीओ, मीम्स पाहिल्यानंतर FOMO म्हणजेच ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’ जाणवू लागल्यानेही (एखादी गोष्ट सर्वजण करत असतील तर आपण त्यात मागे राहतोय अशी भावना मनात निर्माण होणं) अनेकजण ‘धुरंधर’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत. ‘धुरंधर’ने जगभरातील प्रेक्षकांना मोहीत केलं आहे.
राजकारण, गुन्हेगारी, सत्तेची धोकादायक जुगलबंदी, रेहमान डकैतची दहशत या सर्व गोष्टींमुळे हा चित्रपट चर्चा घडवून आणण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे, त्यातील संवाद वजनदार आहेत, चित्रपटाची गती उत्कृष्ट आहे, ज्यामुळे कोणत्याही किरकोळ त्रुटी सहज दिसून येत नाहीत. तरीही काही चाणाक्ष प्रेक्षकांनी चित्रपटील त्रुटी हेरल्या आणि सोशल मीडियाद्वारे त्या लक्षात आणून दिल्या आहेत. चित्रपटातील यलिना, हमजा, जमील जमाली यांसारख्या प्रमुख पात्रांशी संबंधित या चुका आहेत. या चुका पाहून तुम्हीसुद्धा डोक्याला हात लावाल.
जेव्हा यलिना गायब होते..
एका एक्स (ट्विटर) युजरने ही चूक दाखवून दिली. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे यलिना हमजावर प्रेम करते आणि स्वेच्छेने त्याच्यासोबत राहू लागते. तिचे वडील जमील जमाली यांना याबद्दलची जाणीवच नसते. जेव्हा यलिना अनेक दिवस घरी परतत नाही तेव्हा जमीलला समजतं की तिच्या मुलीचं अपहरण झालं आहे. इथेच प्रेक्षकांनी मोठी चूक हेरली. प्रेक्षकांच्या मते अशा परिस्थितीत कोणताही पिता आकाशपाताळ एक करतो. मग जमील तर देशाच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्ती दाखवला आहे, जो खासदार असतो, त्याची पोहोच आणि ताकद वारंवार दाखवली गेली आहे, तरीसुद्धा मुलगी गायब झाल्याचं समजल्यावर तो शांतपणे त्याचा स्वीकार करतो. ही गोष्ट अनेकांच्या पचनी पडली नाही.
One thing I didn’t understand in Dhurandhar was
Yalina was in love with Hamza, but Jameel Jalali (her father) had no idea about it, when she started living with Hamza, Jameel believed she had been kidnapped
From his point of view his daughter was missing for several days. Yet… pic.twitter.com/8kuGTkFswt
— PrinCe (@Prince8bx) December 15, 2025
जर एखाद्या वरिष्ठ राजकीय व्यक्तीची मुलगी गायब झाली असेल तर त्यावरून हंगामा, गोंधळ होणं साहजिक आहे. पोलीस यंत्रणा, मीडिया सर्वजण त्याकडे लक्ष वेधतात. परंतु ‘धुरंधर’मध्ये असं काहीच होताना दिसत नाही. यलिनाला शोधायला कोणतंही मोठं सर्च ऑपरेशन होत नाही किंवा जमीलकडून कोणतं मोठं पाऊल उचललं जात नाही. त्यामुळे कथा कितीही दमदार असली तरी त्यातही ही गोष्ट प्रेक्षकांना खटकली आहे.
पोलिसांकडून रणवीरच्या पाठलागाचा सीन
चित्रपटातील एका दृश्यात क्लबमध्ये पार्टी सुरू असते. यलिना (सारा अर्जुन) या पार्टीत असते, तेव्हा हमजा (रणवीर सिंह) स्थानिक पोलीस अधिक्षकांना (एसपी) फोन करतो आणि त्यांना सूचना देतो की तिथे पार्टी सुरू आहे आणि त्यांनी तिथे छापा टाकावा. जेव्हा त्या क्लबमध्ये पोलीस छापा टाकतात तेव्हा सर्वजण पळू लागतात. अशातच रणवीर साराला त्याच्या बाईकवर लिफ्ट देतो. पोलिसांच्या चार-पाच गाड्या तेव्हा रणवीरचा पाठलाग करतात.
या चित्रपटात उजैर नावाचा एक पात्र दुसऱ्या एका दृश्यात हमजाला सांगतो की त्याच्या टोळीचे स्थानिक पोलीस अधिक्षकांशी चांगले संबंध आहेत. याचा अर्थ ज्या टोळीचा हमजा भाग आहे, त्याला एसपींचा पाठिंबा आहे. तरीही पोलीस त्याचा पाठलाग करतात. ही कल्पना समजणंच कठीण आहे. जर त्याच्या टोळीला पोलिसांचा पाठिंबा असेल तर पोलीस त्याला कसं पकडू शकतात, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

‘धुरंधर’मधल्या इतर काही चुका
- ‘धुरंधर’ या चित्रपटातील एका सीनमध्ये मेजर इक्बाल म्हणतात की 1971 मध्ये त्यांनी झिया-उल-हक यांचं भाषण ऐकलं होतं, ज्यात त्यांनी भारतावर हजार घाव घालण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु 1971 मध्ये झिया-उल-हक असं विधान करण्याच्या स्थितीत होते का? त्यावेळी जुल्फीकार अली भुट्टो यांचं सरकार होतं.
- पाकिस्तानमध्ये बसलेले हँडलर तिथूनच टीव्ही चॅनल्स पाहून दहशतवाद्यांना निर्देश देताना दाखवलं गेलंय. परंतु सत्य हे आहे की दुसऱ्या दिवसापासून मीडिया ‘डेफर्ड लाइव्ह’ दाखवत होतं. म्हणजेच जी घटना पंधरा मिनिटांपूर्वी घडली, ती मीडियामध्ये लाइव्ह दाखवली जात होती. तर मग एनएसजीचे तत्कालीन प्रमुख प्रति तासाला एनएसजी जवानांना पोझिशन सांगत होते. कायद्यानुसार जर कोणी गंभीर माहिती सार्वजनिक करत होते, तर ते खुद्द एनएसजी प्रमुख होते. याबाबत चित्रपट मात्र गप्प आहे.
- चित्रपटाच्या कथालेखनातील आणखी एक चूक म्हणजे एक कथित भारतीय गुप्तहेर पाकिस्तानात कसाबला शस्त्रे पुरवतो. ही कथा खरी नसल्यामुळे भारतीय गुप्तहेराला अशा विषम स्थितीत दाखवणं ही लेखकाची चूक आहे.
- 26/11 च्या हल्ल्यात बलोच लोकांनी मदत केल्याची कोणतीच माहिती समोर आली नव्हती. परंतु ‘धुरंधर’मध्ये असं दाखवलंय की या हल्ल्यासाठी बलुचिस्तानकडून शस्त्रे पुरवली जातात. यामुळे या घटनेच्या खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा हा प्रकार वाटतो.
- चित्रपटाचा नायक रणवीर सिंह आधी रेहमान डकैत याच्या बाजूने काम करत असतो. नंतर तो पाकिस्तानातील भ्रष्ट नेत्यांच्या बाजूने जाऊन रेहमानलाच मारून टाकतो. यामागचा तर्क या भागात तरी पहायला मिळत नाही.
- रेहमान डकैत हिंदुस्तानी अंदाजात मान झुकवून हात उचलून सलाम करतो. याला बलोच सलामी म्हणता येणार नाही.
- या चित्रपटात छोटीशी प्रेमकथा फक्त अपूर्णच नाही तर ती खूप विचित्रसुद्धा आहे. वडिलांवर प्रेम करणारी मुलगी एका अशा पुरुषाकडे आकर्षित होते, जो त्याला मारण्याची योजना आखत असतो आणि त्याची हेरगिरीदेखील करतो. परंतु भारतीय गुप्तहेर तिला त्याची खरी ओळखही सांगू शकत नाही. त्याने स्वत:ची ओळख लपवणं ही बाब जरी स्वाभाविक असली तरी लेखक-दिग्दर्शकाने अशी परिस्थिती का निर्माण केली, जिथे एक भारतीय गुप्तहेर एका मुलीची फसवणूक करत असल्याचं दिसून येत आहे?
- घराबाहेर पडण्यापूर्वी जमील जमालीची मुलगी मंत्री आणि डीएसपी यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ रेकॉर्ड करते. परंतु ती हा व्हिडीओ अशा पद्धतीने रेकॉर्ड करते, जणू काही तिला त्यासाठी परवानगीच मिळाली आहे. गुप्तपणे रेकॉर्ड केला जाणारा व्हिडीओसुद्धा अत्यंत फिल्मी पद्धतीने दाखवण्यात आलं आहे.
- ‘धुरंधर’बाबत अशी तक्रार ऐकायला मिळतेय की यात हिंसाचाराची दृश्ये अत्यंत लांबलचक आणि भयानक पद्धतीने दाखवण्यात आली आहेत. अशी दृश्ये आजकाल सर्वसामान्य झाली असली तरी या चित्रपटात एका विशिष्ट टप्प्यानंतर ते विश्वासार्ह वाटत नाहीत. ही दृश्ये कंटाळवाणी वाटू लागतात. विशेषत: रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्यातील मारामारीचं दृश्य ठराविक वेळेनंतर चिड आणते.
Disclaimer : या लेखात काही स्पॉइलर्स (चित्रपटाच्या कथेबाबत कल्पना देणारे) असले तरी संपूर्ण कथेला किंवा चित्रपटाला हानी पोहोचवी, अशी कोणतीही अतिरिक्त माहिती दिलेली नाही.
Leave a Reply