
घाटकोपर येथील भाजप आमदार पराग शहांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना हा प्रसंग घडला. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईमुळे स्थानिक दुकानदारांनी रस्ता अडवला होता, परिणामी परिसरात मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली होती. या गोंधळाच्या परिस्थितीत, एक रिक्षाचालक विरुद्ध दिशेने आपली रिक्षा घेऊन आला. हे पाहून संतप्त झालेले आमदार पराग शहांनी त्या रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या या वर्तनावर सध्या तीव्र टीका आणि समर्थन अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
बेकायदेशीर अतिक्रमणामुळे नागरिक आणि लोकप्रतिनिधी त्रस्त असल्याने, त्याच उद्रेकातून हे कृत्य घडल्याचे काही समर्थक म्हणत आहेत. दुसरीकडे, वाहतूक पोलिसांचे खाते अस्तित्वात असताना, सत्ताधारी आमदाराने कायदा हातात का घेतला, असा प्रश्नही अनेकजण उपस्थित करत आहेत. पराग शहा हे घाटकोपरचे भाजप आमदार असून, ते बांधकाम व्यावसायिक म्हणूनही ओळखले जातात. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची संपत्ती ५०० कोटींहून अधिक असून, ते मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक आहेत.
Leave a Reply