
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या कार्यपद्धतीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे अधिवेशन जनतेच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा करण्यासाठी आहे की केवळ एक “फॅशन शो” बनले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सात दिवसांच्या अधिवेशनासाठी तब्बल ९० कोटी रुपये खर्च केले जात आहेत, म्हणजेच दररोजचा खर्च सुमारे १२.८ कोटी रुपये इतका आहे. या प्रचंड खर्चाच्या तुलनेत महाराष्ट्राच्या विकासाचे, राज्यावरील वाढत्या कर्जाचे आणि त्याला कसे कमी करावे यासारख्या गंभीर विषयांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी निरर्थक चर्चांना प्राधान्य दिले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दमानिया यांनी अधिवेशनातील आमदारांच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. बिबट्यांच्या विषयासारख्या गंभीर बाबींवर योग्य मार्ग काढण्याची गरज असताना, काही आमदार “फॅन्सी ड्रेस” परिधान करून येत आहेत आणि अनावश्यक विधाने करत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. एका आमदाराने बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा देण्याची मागणी केल्याचा उल्लेख करत, अशा बुद्धिमत्ता असलेल्या आमदारांमुळे महाराष्ट्राची प्रगती कशी होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दमानिया यांच्या मते, विरोधी पक्षाने नवीन आणि महत्त्वाचे विषय मांडून, विशेषतः मुंडव्या प्रकरणासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर सरकारला घेरले पाहिजे होते, परंतु तसे होताना दिसत नाहीये.
Leave a Reply