
अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. अंबरनाथ पश्चिममधील नवीन भेंडी पाडा परिसरात मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पवन वाळेकर यांच्या खाजगी कार्यालयावर चार राऊंड फायर केले. या गोळीबारात कार्यालयाची काचेची दार फुटले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन केले. पोलिसांकडून लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, पोलीस फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र संशयितांची नावे फिर्यादीत समाविष्ट केली जावीत, अशी आंदोलक कार्यकर्त्यांची मागणी आहे.
Leave a Reply