
Ajit Pawar on Mahayuti: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजलं अन चोवीस तासांच्या आत अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या तीन आणि शिंदे शिवसेनेचा एक,अशा चार माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश करुन घेतले. त्यांच्या हातात दादांनी घड्याळ बांधले आणि महायुतीच्या घटक पक्षांना धक्का दिला. इथंच न थांबता दादा आता अर्ज भरण्यापूर्वी भाजप आणि शिंदे शिवसेनेतील आणखी सात ते आठ इच्छुकांच्या हाती घड्याळ बांधणार आहेत, असा दावा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे.
महायुतीत मिठाचा खडा
महायुतीतील घटक पक्षांनी अंतर्गत फोडाफोडी करायची नाही, असं ठरलंय खरं मात्र प्रत्यक्षात अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरु केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पिंपरी चिंचवड मध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल असं म्हणून चोवीस तासचं उलटले असावेत तोवर अजित पवारांनी महायुतीत हा मिठाचा खडा टाकला आहे. मात्र भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत ज्यांना असुरक्षित वाटतंय अशा इच्छुकांनी स्वतःहून राष्ट्रवादीत प्रवेश केलेत, त्यामुळं महायुतीत कटुता निर्माण होणार नाही असा दावा बहल यांनी केला आहे.
भाजपविरोधात राष्ट्रवादीची जय्यत तयारी
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिका इच्छुक उमेदवारांच्या सकाळपासूनच मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेवरती राष्ट्रवादीचाच महापौर असणार असा निर्धार करून निवडणूका लढा व भ्रष्टाचारी भाजपाच्या विरोधात आम्हाला लढायचं आहे अशी प्रतिक्रिया इच्छुक उमेदवारांनी दिली आहे.
भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारी पक्ष आहे, या भ्रष्टाचारी पक्षाच्या विरोधात आम्हाला निवडणूक लढायची आहे. या निवडणुकीमध्ये विकास कामांचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जायचं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास अजित पवार यांनी केला आहे. निवडणूक आव्हानात्मक असली तरी विजय नक्कीच आमचा होईल. अजित पवार यांनी स्वतः मुलाखती घेतल्या त्यांच्याशी बोलल्याने सकारात्मकता वाढली, अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली.
अजित पवार ॲक्शन मोडमध्ये
पिंपरी – चिंचवडमध्ये भाजपा आणि अजित पावराच्या राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर अजित पवार ॲक्शन मोडमध्ये दिसले. अजित पवार पिंपरी – चिंचवडमधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्याचबरोबर भाजपच्या माजी नगरसेवकांनी अजित पावराच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. अजून काही स्थानिक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Leave a Reply